
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध योग शिक्षक आणि एमजीएम विद्यापीठाचे योग विभाग प्रमुख गंगाप्रसाद खरात यांना नुकताच आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, एजीएमए व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयुष विभाग यांच्या वतीने अतिशय प्रतिष्ठेचा मानला गेलेला योग रत्न पुरस्कार मोठ्या सन्मानाने देण्यात आला. राज्यातील विशेष अकरा योग शिक्षकांपैकी खरात गुरुजींना या पुरस्कारासाठी निवडण्यात आले होते.
शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा विशेष पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्रातील योगशिक्षक, योग थेरपिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे डॉ बाबुराव कानडे, डॉक्टर सेलचे डॉ बाळासाहेब पवार, मुख्य आयोजक डॉ नितीन राजे पाटील, डॉ सतीश कराळे आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून योगसाधना, प्राणायाम आणि विपश्यना ध्यान यांचा प्रचार व प्रसार करत असलेल्या गंगाप्रसाद खरात (गुरुजी) यांचे एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ विलास सपकाळ, कुलसचिव डॉ आशिष गाडेकर आणि मित्र परिवार यांनी कौतुक केले आहे.