
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कांचनवाडी येथे जागतिक स्तरावर ड्रोन प्रशिक्षणाची वाढती मागणी आणि भारतातील वाढत्या ड्रोन क्षेत्रातील पार्श्वभूमी लक्षात घेऊन, भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयतर्फे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पहिले रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा मान छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेला मिळाला आहे. या ऐतिहासिक मान्यतेमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल.
छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पहिले प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाल्याने ड्रोन टेक्नॉलॉजीमध्ये व्यवसाय करणाऱ्या तरुण पिढीला रिमोट पायलट प्रमाणपत्रामुळे ड्रोन क्षेत्रात करिअर करण्याची व रोजगाराची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षण केंद्रमार्फत मराठवाड्यातील तरुणांना ड्रोन हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन ड्रोन चालविण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय मार्फत परवाना देण्यात येणार आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकरराव मुळे आणि विश्वस्त समीर मुळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख, छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गणेश डोंगरे, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक अनिल तायडे आणि जनसंपर्क अधिकारी संजय पाटील, उपप्राचार्य डॉ देवेंद्र भुयार यांनी कौतुक करत संपूर्ण संस्थेसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कांचनवाडी येथे रिमोट पायलट प्रशिक्षण केंद्राची मान्यता घेण्यासाठी डॉ राजेंद्र शिंदे, प्रा संजय कुलकर्णी, प्रा सचिन लहाने, शिलम शास्त्रसु, प्रा युवराज नरवडे व रवींद्र घाटे यांनी परिश्रम घेतले.