लहान वयोगटापासून खेळाडूंनी कामगिरीत सातत्य ठेवावे – राजीव मेहता

  • By admin
  • July 6, 2025
  • 0
  • 11 Views
Spread the love

राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत ३९० खेळाडूंचा सहभाग

नाशिक ः भारताच्या खेळाडूंना मोठी मजल गाठण्यासाठी चाईल्ड व मिनी वयोगटाच्या स्पर्धांना विशेष महत्व आहे. या वयापासून खेळाडूंनी आपल्या खेळात सातत्य राखून प्रगती केल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिकपर्यंतची मजल गाठणे शक्य आहे असे मत आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी येथे व्यक्त केले.

महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डीएसएफ स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्या सहकार्याने नाशिकच्या पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित सातव्या चाईल्ड कप आणि १३ व्या मिनी गटाच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेचे उद्घाटन आशियाई तलवारबाजी असोसिएशनचे सरचिटणीस राजीव मेहता यांच्या हस्ते झाले. यावेळी सिग्नेचर इंटरनॅशनल फूड कंपनीने मॅनेजिंग डायरेक्टर यतीन पटेल, नाशिक जिल्हा ऑल गेम्स असोसिएशनचे उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे मार्गदर्शक अशोक दुधारे, महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशनचे सचिव डॉ उदय डोंगरे, आनंद खरे, राहुल वाघमारे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी राजीव मेहता यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रशेखर सिंग, अशोक दुधारे यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. दीपक निकम यांनी सूत्रसंचालन केले.

या स्पर्धेत भारताच्या विविध राज्यांचे ३९० खेळाडू सहभागी झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्रासह जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, दिव-दमण, मणिपूर, आसाम, बिहार, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, ओडिशा, पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ आदी राज्यांचा समावेश आहे.

१० वर्षे मुलींच्या ईप्पी प्रकारात आंध्र प्रदेशच्या खेळाडूंनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून सुवर्ण आणि रौप्य पदकाला गवसणी घातली. तनिष्का गुंडू आणि रेवा पाटील यांनी ही सुवर्ण आणि रौप्य कामगिरी केली. या प्रकारात महाराष्ट्राच्या साई पाटील आणि वसुधा साठे यांनी कांस्य पदक मिळविले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे अध्यक्ष दत्त पाटील, सचिव राजू शिंदे, दीपक निकम, अशोक कदम, उदय खरे, जय शर्मा, आनंद चकोर, राहुल फडोळ, प्रसाद परदेशी, अविनाश वाघ, आणि सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *