
बेन स्टोक्सचा विक्रम मोडला
बर्मिंगहॅम : भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा वेगवान धावा काढण्यासाठी ओळखला जातो. एकदा तो क्रीजवर आला की त्याला बाद करणे कठीण होते. इंग्लंड दौऱ्यावरही पंत चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने दोन्ही डावात शतके झळकावली. आता दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आहे. ही कामगिरी करताना पंतने एक नवा इतिहाल लिहिला आहे. विदेशी भूमीवर २४ षटकार मारणारा पंत आता पहिला फलंदाज ठरला आहे.
बेन स्टोक्सला मागे सोडले
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात ऋषभ पंतच्या बॅटवरून फक्त २५ धावा निघाल्या. पण दुसऱ्या डावात त्याने चांगली फलंदाजी केली आहे. त्याने ५८ चेंडूत ८ चौकार आणि तीन षटकार मारून ६५ धावा केल्या आहेत. यासह तो कसोटीत इंग्लंड देशात सर्वाधिक षटकार मारणारा परदेशी फलंदाज बनला आहे. त्याने बेन स्टोक्स याचा विक्रम मोडला आहे. पंतने आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर एकूण २४ षटकार मारले आहेत. त्याच वेळी, स्टोक्सने दक्षिण आफ्रिकेत २१ कसोटी षटकार मारले होते. आता तो दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर पंत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
इंग्लंडच्या भूमीवर २४ षटकार
ऋषभ पंतने आतापर्यंत इंग्लंडच्या भूमीवर एकूण ११ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ८९८ धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने चार शतके आणि तीन अर्धशतके देखील झळकावली आहेत. त्याने इंग्लंडमध्ये २४ षटकार मारले आहेत. तो इंग्लंडच्या भूमीवर सर्वाधिक कसोटी षटकार मारणारा परदेशी फलंदाज देखील आहे.
३००० हून अधिक धावा
ऋषभ पंतने २०१८ मध्ये भारतीय संघासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून, त्याने संघासाठी ४५ कसोटी सामन्यांमध्ये एकूण ३२९० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ८ शतके आणि १६ अर्धशतके झाली आहेत.
एकाच देशात कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे परदेशी फलंदाज
२४ – ऋषभ पंत, इंग्लंड
२१ – बेन स्टोक्स, दक्षिण आफ्रिका
१९ – मॅथ्यू हेडन, भारत
१६ – हॅरी ब्रुक, न्यूझीलंड
१६ – विवियन रिचर्ड्स, इंग्लंड