
भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने मोठा निर्णय, रोहित पवार, सचिन मुळे, कमलेश पिसाळ यांनी केले स्वागत
पुणे ः भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि युवा स्टार पृथ्वी शॉ याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निरोप घेतला असून आगामी हंगामापासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाची ताकद यामुळे अधिक बळकट होणार आहे.
पृथ्वी शॉ याने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने सातत्यपूर्ण व भरीव कामगिरी करत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शॉच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ साली अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३ शतके आणि ४५०० हून अधिक धावा आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार, सीएसी कमिटीचे चेअरमन सचिन मुळे, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव कमलेश पिसाळ यांनी मुंबईत एका कार्यक्रमात पृथ्वी शॉ याचे स्वागत केले.
प्रेरणादायी वातावरण ः पृथ्वी शॉ
आपल्या निर्णयाविषयी बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला की, “कारकिर्दीतील या वळणावर मी एक क्रिकेटपटू म्हणून स्वतःची वाढ आणि विकासासाठी महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आजवर मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यभर विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमन्स एमपीएल, कॉर्पोरेट शील्ड, डी बी देवधर ट्रॉफी यांसारखे उपक्रम ही त्याची साक्ष आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की, अशा प्रेरणादायी वातावरणात खेळल्याने माझ्या कारकिर्दीला नवे वळण मिळेल व क्रिकेटपटू म्हणून अधिक प्रगती करू शकेन. तसेच रुतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुरबानी आणि मुकेश चौधरी यांसारख्या गुणवान खेळाडूंसोबत महाराष्ट्र संघात खेळण्याची संधी मिळेल, याचा मला आनंद आहे.”

महाराष्ट्र संघ अधिक भक्कम होईल – रोहित पवार
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, भारतीय संघाचे सर्व फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केलेला स्टार खेळाडू पृथ्वी शॉ यांनी महाराष्ट्र संघात खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. आमच्या संघात ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, मुकेश चौधरी, रजनीश गुरबाणी यांसारखे अनुभवसंपन्न व नवोदित खेळाडू आहेत. अशा वेळी पृथ्वी शॉ सारख्या ऑल-फॉरमॅट खेळाडूची भर पडल्यामुळे महाराष्ट्र संघ अधिक भक्कम होईल, याची आम्हाला खात्री आहे. पृथ्वी शॉने आतापर्यंत भारतीय संघात व आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचा अनुभव व आक्रमक खेळ नव्या पिढीच्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शक ठरेल. पृथ्वी शॉ याला महाराष्ट्र संघात सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आमच्या अपेक्स कमिटी आणि सीएसी कमिटीचे आभार मानतो. तसेच त्याच्या आगामी कारकिर्दीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पूर्णपणे पाठीशी उभा राहणार आहे.”
आता चुरस वाढेल – सचिन मुळे
सीएसी कमिटीचे चेअरमन सचिन मुळे म्हणाले की, पृथ्वी शॉ महाराष्ट्र संघाकडून खेळणार असल्याने साहजिकच मोठी चुरस असणार आहे. पृथ्वीमुळे युवा गुणवान खेळाडूंना देखील प्रेरणा मिळेल. एमसीए आणि रोहित पवार यांच्या कार्यपद्धतीवर पृथ्वीने विश्वास दाखवला आहे. पृथ्वीच्या या निर्णयाचा फायदा महाराष्ट्र क्रिकेटला नक्कीच होईल असे सचिन मुळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अलिकडच्या काळात विविध स्पर्धा व उपक्रमांद्वारे राज्यातील क्रिकेटची व्याप्ती वाढवण्याचे कार्य हाती घेतले आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि वुमन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांनी नव्या क्रिकेटपटूंना व्यासपीठ मिळवून दिले आहे. याच पार्श्वभूमीवर पृथ्वी शॉचा महाराष्ट्र संघात समावेश होणे, हे राज्याच्या क्रिकेटसाठी एक नवे पर्व ठरेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डी बी देवधर टूर्नामेंट या दर्जेदार स्पर्धेतही पृथ्वी शॉ सहभागी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या स्पर्धेच्या दर्जात अधिक भर पडेल.