
परभणी ः वीर संभाजी सेवाभावी संस्था पाथरगव्हाण (बु) अंतर्गत तरुण संघर्ष क्रीडा मंडळ पाथरी आणि युनिटी फाउंडेशन परभणीचा खेळाडू किशोर किसनराव जगताप याची भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.
परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनाचा खेळाडू किशोर किसनराव जगताप याची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून कबड्डी दिनानिमित्त गौरविण्यात येणार आहे. युनिटी फाउंडेशन व तरूण संघर्ष क्रीडा मंडळाचा अष्टपैलू कबड्डी खेळाडू किशोर जगताप याने राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. मनमाड (नाशिक) येथे झालेल्या राज्यस्तरीय असोसिएशन कबड्डी स्पर्धेत किशोर याने सुवर्णपदक मिळवले होते. राष्ट्रीय स्पर्धा रसलपुर (गया) बिहार येथे किशोर जगताप याची निवड झाली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन केल्यामुळे त्याची भारतीय संघाच्या सराव शिबिरामध्ये निवड झाली आहे.

किशोर जगताप हा उत्कृष्ट कबड्डी खेळाडू असून डाव्या बाजूने उत्कृष्ट चढाई करतो आणि कोपरा रक्षक म्हणून खेळतो त्याची ख्याती आहे. राज्य पातळीवर परभणी जिल्ह्याला सुवर्ण पदक मिळवून देणारा किशोर किसनराव जगताप हा मौजे भांडेगाव (हिंगोली) गावचा आहे. लाल मातीतला हिरा महाराष्ट्राचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात येणार आहे.
अनुभवी राष्ट्रीय खेळाडूंचे मार्गदर्शन व युनिटी फाऊंडेशन, तरूण संघर्ष क्रीडा मंडळ कबड्डी संघात ओपनच्या अनेक स्पर्धा गाजवल्या त्या अनुभवातून सातत्याने मेहनत घेऊन तो यशस्वी झाला. परभणी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सुरेशराव वरपुडकर व जिल्हा कबड्डी असोसिएशन सचिव व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे खजिनदार मंगल पांडे आदींनी किशोर जगतापचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या आहेत.