
नाशिक ः अविनाश जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सह्यमित्र फाऊंडेशन गेली तीन वर्षे नाशिक येथे सह्याद्री मित्र संमेलन आयोजित करत आले आहे. या संमेलनात गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्राप्त उमेश झिरपे यांना सह्याद्रीरत्न हा मानाचा पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये साहसी क्रीडा प्रकार असलेल्या गिर्यारोहण आणि प्रस्तरारोहण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा, संस्थांचा सन्मान या संमेलनामध्ये करण्यात येतो. तसेच सोबत छायाचित्र प्रदर्शन, विविध विषयांवरील व्याख्याने, मुलाखत, परिसंवाद आणि विविध स्पर्धा या संमेलनात पार पडतात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील गिर्यारोहक, दुर्गप्रेमी, साहसप्रेमी आणि शिवप्रेमी या संमेलनाला आवर्जून उपस्थिती लावतात.
यावर्षीच्या संमेलनात गिरिप्रेमी संस्थेचे ज्येष्ठ गिर्यारोहक तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित उमेश झिरपे यांना यावर्षीच्या मानाच्या सह्याद्रीरत्न २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या ३५ वर्षांमध्ये सह्याद्री आणि हिमालय क्षेत्रात अतुलनीय कामगिरीबद्दल उमेश झिरपे यांना हा पुरस्कार अभिनेता मिलिंद गुणाजी, डॉ विजय सूर्यवंशी आणि ॲड नितीन ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. याच प्रसंगी गिरिप्रेमी संस्थेचे अष्ठहजारी शिखरवीर जितेंद्र गवारे यांचाही हिमालयातील सात अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केल्याबद्दल सन्मान करण्यात आला.