
निफाड ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळस रामाचे येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले. सर्वधर्म प्रेम, सहिष्णुता आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या दिंडीने परिसर भक्तीरसात न्हाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.
देव एकच आहे,त्याची नावे अनेक असू शकतात,पण मानवतेचा हात हाच श्रेष्ठ धर्म आहे असा संदेश या दिंडीच्या माध्यमातून देण्यात आला. शाळेच्या बालगोपालांनी वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेत सजून टाळ,मृदंग, लेझीम पखवाजाच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करत परिसर पंढरपूरमय केला.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने, नवनाथ बटवल, मनोज दलाल, दिनेश पाटील, पोपट मोरे, प्रदीप पालवी, लता जाधव, शीला कसबेकर, माधुरी सोनवणे, पल्लवी भडके, रंजना पैठणकर, जयश्री मोरे, मयुरी पंडित इत्यादी उपस्थित होते .
शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र दुसाने यांनी विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय, संत परंपरा व विठ्ठलभक्ती याविषयी माहिती दिली. क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांनी विठ्ठलाच्या तालावर लेझीम पथक पथकाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेची ओळख, सामाजिक ऐक्य, प्रेम, सहिष्णुता आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला.