
श्रीलंका संघाचा २-१ ने विजय, कुसल मेंडिसचे शानदार शतक
कोलंबो ः बांगलादेश संघ सध्या ऑल फॉरमॅट मालिकेसाठी श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली, जी श्रीलंकेने २-१ अशी जिंकली. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशला ९९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना कुसल मेंडिसच्या शतकाच्या जोरावर ७ विकेट गमावून २८५ धावा केल्या. प्रत्युत्तरात, बांगलादेश संघ १८६ धावा करून सर्वबाद झाला. त्याआधी, दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली, जी श्रीलंकेने १-० अशी जिंकली.
कुसल मेंडिसचे सहावे शतक
या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, श्रीलंकेला १३ धावांवर पहिला धक्का बसला, जेव्हा सलामीवीर निशान मदुशंका १ धावा काढून बाद झाला. त्याच्यानंतर, निशंका आणि कुसल मेंडिस यांच्यात ५६ धावांची भागीदारी झाली. या सामन्यात निशांक ४७ चेंडूत ३५ धावा काढून बाद झाला. त्यानंतर कर्णधार चारिथ अस्लंका आणि कुसल मेंडिस यांनी डावाची सूत्रे हाती घेतली. चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये १२४ धावांची भागीदारी झाली. असलंका ६८ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला, तर कुसल मेंडिस याने त्याच्या कारकिर्दीतील सहावे एकदिवसीय शतक ठोकले. ११४ चेंडूत १२४ धावा काढून तो बाद झाला. या दोन्ही फलंदाजांच्या बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा कोणताही फलंदाज क्रीजवर टिकू शकला नाही. बांगलादेशकडून तस्किन अहमद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
बांगलादेशची फलंदाजी अपयशी
या सामन्यात बांगलादेश संघाची फलंदाजी खूप खराब होती. २८६ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेश संघ सुरुवातीपासूनच विकेट गमावत राहिला. संघाला पहिला धक्का तंजीद हसनच्या रूपात लागला, जो १७ धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला नझमुल हसन शांतो या सामन्यात आपले खातेही उघडू शकला नाही. या सामन्यात तौहिद हृदयॉय याने अर्धशतक झळकावले पण त्याच्यानंतरचे फलंदाज या सामन्यात काही खास करू शकले नाहीत. हृदयॉयने या सामन्यात ७८ चेंडूत ५१ धावा केल्या. संपूर्ण बांगलादेश संघ ४० षटकेही फलंदाजी करू शकला नाही आणि ३९.४ षटकांत १८६ धावा करून सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत असिता फर्नांडो आणि दुष्मंथा चामीरा यांनी ३-३ बळी घेतले. त्यांच्याशिवाय दुनिथ वेलागे आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.