
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे ः पुण्यातील ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालय व मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन (एमपीसीए) यांनी एकत्र येत इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडियममध्ये ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालयाची शाखा सुरू केली आहे.
मोठमोठ्या क्रिकेटपटूंनी विविध सामन्यांमध्ये वापरलेल्या क्रिकेटच्या वस्तूंचा संग्रह असलेल्या या संग्रहालयाचे औपचारिक उद्घाटन केंद्रीय दूरसंचार मंत्री व देशाच्या पूर्वोत्तर क्षेत्राचे विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते संपन्न झाले. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर आणि ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट संग्रहालायचे संस्थापक रोहन पाटे या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोहन पाटे म्हणाले, “देशातील क्रिकेटप्रेमी तरुण पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने मी २०१२ मध्ये पुण्यात ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे मोठमोठ्या क्रिकेटपटूंनी वापरलेल्या क्रिकेटच्या वस्तूंचा संग्रह असलेले पहिले क्रिकेट संग्रहालय स्थापन केले. मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने इंदौरच्या होळकर स्टेडियममध्ये ब्लेड्स ऑफ ग्लोरीची शाखा सुरु होत आहे हा आमच्यासाठी खरोखरच अभिमानाचा क्षण आहे.”
या दरम्यान करण्यात आलेल्या सामंजस्य करारानुसार, पुढील पाच वर्षे ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे इंदौरच्या होळकर क्रिकेट स्टेडीयममध्ये आपला संग्रह प्रदर्शित करेल. प्रदर्शनातील संग्रह हा दर ६ महिन्यांनी बदलला जाईल अशी माहिती पाटे यांनी दिली.
या संग्रहालयात मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशन, भारतीय क्रिकेट आणि जागतिक क्रिकेट यांना समर्पित असे ३ महत्त्वाचे विभाग आहेत असे सांगत पाटे म्हणाले की, “या संग्रहालयात मोठमोठ्या क्रिक्रेटपटूंनी वापरलेल्या ५०० क्रिकेटच्या वस्तूंचा समावेश असून यापैकी ४०० वस्तू या ब्लेड्स ऑफ ग्लोरी ने उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघांच्या स्वाक्षऱ्या असलेल्या बॅटस, सर डॉन ब्रॅडमन यांनी वापरलेली बॅट, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश सारख्या देशांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघातील प्रसिद्ध खेळाडूंचे क्रिकेट साहित्य यांचा या संग्रहामध्ये समावेश आहे.”
संग्रहालयात भारतीय क्रिकेटच्या युगात एक सर्वोत्तम काळ मानल्या गेलेल्या काळातील खेळाडूंना समर्पित असा एक विशेष विभाग तयार करण्यात आला आहे. यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि राहुल द्रविड यांनी वापरलेल्या क्रिकेटच्या वस्तूंचा समावेश आहे. याशिवाय या संग्रहालयात इतर महान भारतीय खेळाडूंनी वापरलेले क्रिकेट साहित्य देखील क्रिकेट प्रेमींना पहायला मिळेल.
होळकर स्टेडियमवरील या संग्रहालयाचे उद्घाटन ७ जुलै रोजी झाले असून हा दिवस एम एस धोनीचा वाढदिवस असल्याने रोहन पाटे यांनी यावेळी ज्योतिरादित्य सिंधिया यांना २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत एम.एस. धोनीने वापरलेला खास टी-शर्ट भेट दिला.
ब्लेड्स ऑफ ग्लोरी विषयी – २०१२ साली क्रिकेटचे चाहते असलेल्या पुण्याच्या रोहन पाटे यांनी ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेट संग्रहालयाची स्थापना केली. मोठमोठ्या क्रिकेटपटूंनी वापरलेल्या क्रिकेटच्या वस्तूंचा संग्रह असलेल्या या संग्रहालयाचे उद्घाटन स्वत: भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केले. त्यानंतर विराट कोहली, राहुल द्रविड, कपिल देव, युवराज सिंग, सर विवियन रिचर्ड्स, क्लाईव्ह लॉयड, वसीम अक्रम, ब्रेट ली, ख्रिस गेल यांच्यासह अनेक प्रतिष्ठित खेळाडूंनी संग्रहालयाला आजवर भेट दिली आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांच्या संघांनीही भारत दौऱ्यावर असताना ब्लेड्स ऑफ ग्लोरी संग्रहालयाला भेट दिली आहे.
संग्रहालयाविषयी अधिक माहितीसाठी कृपया पुढील संकेतस्थळाला भेट द्या – www.bladesofglorymuseum.com/