
पाच पदकांची कमाई
रायगड ः एसएनजी इंटरनॅशनल स्कूल उलवे येथील विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिकृत रायगड जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ५ पदकांची लक्षणीय कमाई केली आहे.
यामध्ये सुवर्णपदक विजेत्यांची आगामी राज्यस्तरीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा १८ ते २० जुलै २०२५ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे होणार आहे.
या स्पर्धेत सब-ज्युनियर गटात जनन्या मुकेश मोरे (२२ किलो) हिने सुवर्णपदक जिंकले. अनन्या सिंग (३२ किलो) हिने सुवर्णपदक पटकावले. दर्पण दिनेश पवारने (३५ किलो) रौप्य पदक संपादन केले. देवांशी गिरमकरने (२४ किलो) सुवर्ण पदक आणि अनिका ठोंबरे (२० किलो) हिने कांस्य पदक जिंकले.
सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थ्यांची रायगड संघामध्ये निवड होणे हे त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे फलित आहे. तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक रोहित सिनलकर यांची रायगड संघाचे अधिकृत प्रशिक्षक म्हणून निवड झाली आहे. या यशस्वी खेळाडूंचा प्राचार्या डॉ देबोलीना रॉय यांच्या हस्ते शाळेमध्ये विशेष सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमावेळी क्रीडा शिक्षक बंडू पुंडकर, शैलेश बाळासाहेब पाटील, रोहित तानाजी सिनलकर व निता प्रफुल्ल म्हात्रे यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
या सर्व शिक्षक व मार्गदर्शकांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या यशामागील मोलाचा आधार ठरले. सर्व खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करत शाळेचे खेळाडू राज्य पातळीवर नवा इतिहास घडवतील, असा आत्मविश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.