
ठाण्याचा आदिराज चव्हाण विजेता
परभणी ः ठाणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत परभणीच्या आद्या बाहेती व ठाण्याच्या आदिराज चव्हाण यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
प्रतीक तुलसानी पहिली महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा ६ ते १० जुलै दरम्यान ऐरोली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झाली. ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत ११ व १३ वर्षे मुले-मुलींच्या गटांमध्ये पहिल्या दोन दिवसात खूप चुरशीचे सामने झाले.
या स्पर्धेत अकरा वर्ष मुलींच्या गटांमध्ये परभणीच्या आद्या महेश बाहेती हिने सुवर्णपदक पटकावले तर आहाना गोडबोले (पुणे) हिने उपविजेतेपद संपादन केले. या गटात श्रीनिका उमेकर आणि वृंदा महापदी (पुणे) या खेळाडूंनी तिसरा क्रमांक संपादन केला. १३ वर्षाखालील मुलींच्या गटात केशीका पूरकर (नाशिक) हिने विजेतेपद मिळवले. पलक झंवर (मुंबई उपनगर) हिने उपविजेतेपद संपादन केले. रितन्या देवळेकर व गीत जगताप (कोल्हापूर) यांनी तिसरे स्थान मिळवले.
११ वर्षांखालील मुलांच्या गटात आदिराज चव्हाण (ठाणे) याने विजेतेपद पटकावले. तसेच वरदान कोलते (पुणे) याने उपविजेतेपद तर राजवर्धन तिवारी (सोलापूर) याने तिसरा क्रमांक संपादन केला. १३ वर्षे मुलांच्या गटात आहात याने जेतेपद तर पुण्याच्या नीलम मुळे याने उपविजेतेपद संपादन केले.
राज्य अध्यक्ष प्रवीण लुंकड, राज्य सरचिटणीस यतिन टिपणीस, राज्य कोषाध्यक्ष संजय कडू, कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, प्रशिक्षक चेतन मुक्तावार यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.