
बीड ः महाराष्ट्रासाठी सातत्याने उत्तम कामगिरी करणारा आणि नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सातारा संघाचे कर्णधारपद भूषवणारा बीडचा सुपुत्र सौरभ नवले याने बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
सौरभ नवले याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत केली होती. अनेक निमंत्रिकांच्या स्पर्धांमध्ये त्याने बीडकडून शानदार कामगिरी करत बीडच्या क्रिकेट क्षेत्रात स्वतःची ठसा उमटवला होता. या भेटीदरम्यान त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्या दिवसांच्या आठवणींमध्ये रममाण झाला.
एमपीएल क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर सौरभ नवले याने खास वेळ काढत बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला भेट दिली. या भेटीला सौरभ नवले याचे वडील शिवाजी नवले हे उपस्थित होते. यावेळी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव डॉ आमिर सलीम, तसेच अॅड राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिजवान खान, अतिक कुरेशी, अक्षय नरवडे व पठाण शाहरुख आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांनी सौरभ नवले याचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.