
सोलापूर ः १२व्या राज्य युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन सिंहगड इन्स्टिट्यूट येथे १२ व १३ जुलै दरम्यान करण्यात आले असल्याचे स्पर्धा संयोजक भीमराव बाळगे व इक्बाल शेख यांनी कळविले आहे.
भारतीय शालेय क्रीडा महासंघ मान्यता प्राप्त युनिफाईड वेल्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने महाराष्ट्र युनिफाईट वेल्फेअर असोसिएशन व युनिफाईड वेल्फेअर असोसिएशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. युनिफाईट हा खेळ मार्शल आर्टमधील लोकप्रिय खेळ आहे. या स्पर्धा सब ज्युनिअर, ज्युनिअर व सीनिअर गटातून तसेच विविध वजनी व वयोगटातून होणार आहे.
या स्पर्धेसाठी विजयी खेळाडूंना प्रथम, द्वितीय व तृतीय याप्रमाणे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकासोबत प्राविण्यप्राप्त व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त पदके घेणाऱ्या संघाला सांघिक विजेते व उपविजेतेपद व तृतीय क्रमांकाचे करंडक देण्यात येईल. स्पर्धेतील पदक व करंडक हवा ट्रेडर्सचे संचालक सिद्दिक कलादगी यांनी पुरस्कृत केली आहेत. स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी पुरस्कृत केली आहेत. खेळाडूंची भोजन व निवास व्यवस्था सेवा आघाडी इन्स्टिट्यूट येथे करण्यात आली आहे. सिंहगड इन्स्टिट्यूटचे प्रमुख दत्तात्रय नवले यांचेही यासाठी सहकार्य लाभत आहे
ही स्पर्धा महाराष्ट्र युनिफाईट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष खंदारे व सचिव मंदार पनवेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून या स्पर्धेतून विविध वजनी वयोगटात निवड झालेल्या खेळाडूंची राष्ट्रीय युनिफाईट अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन १२ जुलै रोजी सकाळी ११ वाजता व पारितोषिक वितरण समारंभ १३ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. या स्पर्धेसाठी विविध समित्या करण्यात आल्या असून स्पर्धा यशस्वी करण्यासाठी धनंजय धेंडे, मनोज बाळगे, अमोल घोडके, प्रचिता जोगदांडे व पौर्णिमा पुजारी आदी परिश्रम घेत आहेत.