
मँचेस्टर ः चौथा टी २० सामना जिंकून भारतीय महिला संघाने पहिल्यांदा इंग्लंड भूमीत टी २० मालिका जिंकली. या सामन्यात भारताची अनुभवी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माने चेंडूने इतिहास रचला आहे. दीप्ती आता महिला टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनली आहे. तिने या बाबतीत पाकिस्तानी फिरकी गोलंदाज निदा दारला मागे टाकले आहे.
यापूर्वी महिला टी २० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फिरकी गोलंदाजांमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम निदा दारच्या नावावर होता. तिने या फॉरमॅटमध्ये १४४ बळी घेतले होते. पण आता दीप्ती शर्माने तिला मागे टाकले आहे, ती आता सर्वाधिक बळी घेणारी फिरकी गोलंदाज बनली आहे. तिच्या नावावर सध्या १४५ बळी आहेत. त्याच वेळी, महिला टी-२० मध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या मेगा शटच्या नावावर आहे. तिने या फॉरमॅटमध्ये १५१ विकेट्स घेतल्या आहेत आणि दीप्ती शर्माला तिला मागे टाकण्यासाठी आणखी ७ विकेट्सची आवश्यकता आहे.
दीप्ती शर्मा यशस्वी अष्टपैलू खेळाडू
दीप्ती शर्मा हिने आतापर्यंत ५ कसोटी, १०६ एकदिवसीय आणि १२७ टी २० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने कसोटीत २०, एकदिवसीय सामन्यात १३५ आणि टी-२० मध्ये १४४ विकेट्स घेतल्या आहेत. मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये ती भारताची सर्वात यशस्वी अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. महिला एकदिवसीय सामन्यातही तिच्या नावावर शतक आहे.
मँचेस्टरमध्ये खेळला गेलेला चौथा टी २० सामना भारतीय संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला आणि ५ सामन्यांच्या टी २० मालिकेत ३-१ अशी अजिंक्य आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने ७ विकेट्स गमावून १२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात, टीम इंडियाने १७ षटकांत ४ विकेट्स गमावून १२७ धावांचे लक्ष्य गाठले. राधा यादवला तिच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.