राज्य टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या वरदान, नीरव व अहाना यांना उपविजेतेपद

  • By admin
  • July 10, 2025
  • 0
  • 63 Views
Spread the love

ठाणे ः ठाणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेने महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या प्रतिक तुलसानी चषक पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुण्याच्या वरदान कोलते, अहना गोडबोले  व नीरव मुळ्ये यांनी आपल्या वयोगटात उपविजेते पदावर आपली मोहोर नोंदवित कौतुकास्पद कामगिरी केली

ही स्पर्धा ऐरोली येथील ऐरोली स्पोर्ट्स असोसिएशन, विब्ग्योर प्रशालेजवळ येथे सुरू आहे. मुलांच्या अकरा वर्षाखालील गटात ठाण्याच्या अधिराज चव्हाण यांनी वरदान कोलते याचा ११-४, ७-११, ११-६, ७-११, ११-७ असा चुरशीच्या लढतीनंतर पराभव केला. उपांत्य फेरीत वरदान याने मुंबई महानगर संघाचा खेळाडू युवान वालीया याचे आव्हान संपुष्टात आणले होते. वरदान हा क्रीडा प्रबोधिनी मध्ये असाद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तो एड्युकान इंटरनॅशनल प्रशालेमध्ये पाचव्या इयत्तेत शिकत आहे.

मुलींच्या अकरा वर्षाखालील गटाच्या अंतिम लढतीत परभणीच्या आद्या बाहेती हिने अहाना गोडबोले या पुण्याच्या खेळाडूला ११-९,११-७, ११-३ असे सरळ तीन गेम्स मध्ये पराभूत केले. उपांत्य फेरीत बाहेती हिने पुण्याच्या श्रीनिका उमेकर हिचा पराभव केला होता तर अहाना हिने आपली सहकारी वृंदा महापदे हिला पराभूत केले होते. अहाना ही शामराव कलमाडी प्रशालेत इयत्ता पाचवीत शिकत असून तिला टॉस अकादमी मध्ये दीपेश अभ्यंकर व मकरंद साने यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

मुलांच्या तेरा वर्षाखालील गटात अयान आठर (टीएसटीटीए) याने पुण्याच्या नीरव मुळ्ये याला उत्कंठापूर्ण लढतीमध्ये १२-१०,१३-११८-११, १२-१० असे पराभूत केले. उपांत्य फेरीत अयान याने स्वराज रेडकर याला हरवले होते तर नीरव याने ठाण्याच्या अधिराज चौहान याच्यावर मात केली होती. नीरव हा त्याचे वडील उपेंद्र मुळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन जिमखाना रेडीयंट अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. तो इंडस प्रशालेमध्ये सहाव्या इयत्तेत शिकत आहे.

मुलींच्या तेरा वर्षाखालील गटात केशिका पूरकर (टीएसटीटीए) हिने आपलीच सहकारी पलक झंवर हिच्यावर ११-८,११-८,८-११,११-५ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *