
जो रुट ३७व्या शतकाच्या उंबरठ्यावर; इंग्लंड ४ बाद २५१ धावा
लंडन : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील तिसऱ्या कसोटीला लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली. कसोटीचा पहिला दिवस अनुभवी फलंदाज जो रुट याने दमदार फलंदाजी करून गाजवला. दुसरा कसोटी जिंकून भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांवर दबाव वाढवला हे पहिल्या दिवसाच्या खेळावरुन दिसून आले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने ८३ षटकात चार बाद २५१ धावसंख्या उभारली आहे. ३.०२ च्या सरासरीने इंग्लंडने धावा काढल्या. या कसोटीत भारताने इंग्लंडला बॅझबॉल क्रिकेट विसरण्यास भाग पाडले.
इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आला तर इंग्लंड संघात जोफ्रा आर्चर याने पुनरागमन केले.
झॅक क्रॉली आणि बेन डकेट या सलामी जोडीने ४३ धावांची भागीदारी करत संघाला सुरेख सुरुवात करुन दिली. युवा गोलंदाज नितीश कुमार रेड्डी याने बेन डकेटला २३ धावांवर बाद करुन इंग्लंडला पहिला धक्का दिला. त्याच षटकात नितीन रेड्डीने झॅक क्रॉली याला १८ धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. त्याने दोन बळी घेऊन आपली क्षमता दाखवून दिली. डावातील १४व्या षटकात इंग्लंडची सलामी जोडी तंबूत परतली.

२ बाद ४४ अशा परिस्थितीत ऑली पोप आणि जो रुट या जोडीने दमदार फलंदाजी करत भारतीय गोलंदाजी निष्प्रभ ठरवण्याचा प्रयत्न केला. पोप-रुट जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी करत भारतीय गोलंदाजांची कठीण परीक्षा घेतला. रवींद्र जडेजा याने टी-टाईमनंतरच्या पहिल्याच षटकात ऑली पोपला ४४ धावांवर बाद करुन संघाला हवे असलेले यश मिळवून दिली. यष्टीरक्षक ध्रुव जुरेल याने सुरेख झेल घेतला. त्यानंतर बुमराह याने हॅरी ब्रूकला ११ धावांवर बाद करुन इंग्लंडला चौथा धक्का दिला. त्यावेळी इंग्लंडची धावसंख्या १७२ होती.
जो रुट शतकाच्या उंबरठ्यावर
जो रुट व बेन स्टोक्स या जोडीने पाचव्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला. १७० चेंडूत ही भागीदारी नोंदवल्या गेली. जो रुट १९१ चेंडूंचा सामना करत ९९ धावांवर खेळत आहे. रुट याने नऊ चौकार मारले. रुट याला ३७ वे कसोटी शतक झळकावण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. स्टोक्स याने १०२ चेंडूत ३९ धावा फटकावल्या. त्याने केवळ तीन चौकार मारले. इंग्लंडने ८३ षटकात चार बाद २५१ धावा काढल्या. नितीश कुमार रेड्डी याने दोन विकेट घेतल्या. बुमराह व जडेजा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
रूट दिग्गजांच्या यादीत सामील झाला
रूट एकाच संघाविरुद्ध कसोटीत ३००० धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा रूट हा एकमेव फलंदाज आहे. यासह, रूट डॉन ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर सारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. ब्रॅडमन यांनी इंग्लंडविरुद्ध ५०२८ धावा केल्या आहेत. ब्रॅडमन, जॅक हॉब्स, सचिन, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड गॉवर, गॅरी सोबर्स आणि स्टीव्ह वॉ हे अशा फलंदाजांमध्ये आहेत ज्यांनी संघाविरुद्ध कसोटीत ३००० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
पंतच्या बोटाला दुखापत
बीसीसीआयने म्हटले आहे की, ‘टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंतच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. सध्या तो उपचार घेत आहे आणि वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल यष्टीरक्षक म्हणून भूमिका बजावत आहे.’