
छत्रपती संभाजीनगर ः गच्चीबोली स्टेडियम, हैदराबाद, तेलंगाना येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय ज्युनियर गट वुशू अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्रच्या आयुषी घेवारे हिने मुलींच्या ४५ ते ४८ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. तसेच अनुष्का जैन हिने ४५ किलो आतील गटात कांस्यपदक जिंकले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची खेळाडू आयुषी घेवारे हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना ४८ किलो आतील वजनी गटात आसाम, मणिपूर, जम्मू आणि काश्मीर, हरियाणा व राजस्थान या राज्याच्या खेळाडूंना पराभूत करून महाराष्ट्र राज्याला सुवर्णपदक मिळवून दिले. तर अनुष्का जैन हिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
या यशाबद्दल जिल्हा वुशू संघटनेचे अध्यक्ष अंबादास दानवे, माजी महापौर नंदकुमार घोडेले, वुशू राज्य संघटनेचे सचिव सोपान कटके, वुशू जिल्हा संघटनेचे सचिव व मुख्य प्रशिक्षक महेश इंदापुरे, प्रशिक्षक सुमित खरात, झहूर अली, बंटी राठोड, सुरेश जाधव यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.