
नवी दिल्ली ः आशिया कप हॉकी स्पर्धेपूर्वी पाकिस्तानने एक नवा ड्रामा सुरू केला आहे. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आशिया कप आणि ज्युनियर वर्ल्ड कपसाठी त्यांचा राष्ट्रीय हॉकी संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ते भारतातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे म्हटले आहे.
दहशतवाद्यांचा कारखाना मानल्या जाणाऱ्या पाकिस्तानच्या एका उच्च सरकारी अधिकाऱ्याने धमकी दिली आहे की जर राष्ट्रीय संघाला कोणताही सुरक्षा धोका असेल तर संघ भारतात पाठवला जाणार नाही. पंतप्रधानांच्या युवा विकास आणि क्रीडा कार्यक्रमाचे अध्यक्ष राणा मशूद यांनी एक हास्यास्पद विधान केले आहे की जर पाकिस्तान सरकार भारतातील सुरक्षा परिस्थितीवर पूर्णपणे समाधानी असेल तरच पाकिस्तान हॉकी संघ या स्पर्धांसाठी शेजारील देशाला भेट देईल. मशूद म्हणाले, ‘सरकार पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेईल आणि जर ते समाधानी नसेल तर ते त्यांच्या कोणत्याही खेळाडूला पाठवणार नाही.
आशिया कप स्पर्धेतून विश्वचषकासाठी पात्रता मिळवणार
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतात प्रवास करणे सुरक्षित नाही, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तान हॉकी फेडरेशनने (पीएचएफ) भारतात होणाऱ्या दोन प्रमुख हॉकी स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघ पाठवण्यासाठी संबंधित मंत्रालयांकडून सल्ला आणि परवानगी मागितली आहे. पुढील महिन्यात होणारा आशिया कप २०२६ मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता ठरेल. भारत आधीच पात्र ठरला आहे.
पीएचएफचे सरचिटणीस राणा मुजाहिद यांनी कबूल केले की पूर्वी पाकिस्तानने भारतात होणाऱ्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. ते म्हणाले, ‘पण आता परिस्थिती वेगळी आहे, संबंध तणावपूर्ण आहेत, त्यामुळे सरकार परवानगी देईल तेव्हाच आम्ही पुढे जाऊ शकतो.’ त्यांनी सांगितले की, पीएचएफ सोशल मीडियावर हॉकी संघाच्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या धमक्यांवर लक्ष ठेवून आहे.
एशिया कप २७ ऑगस्टपासून सुरू होईल
यापूर्वी, भारतीय क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले होते की ते पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या आशिया कपमध्ये सहभागी होण्यापासून पाकिस्तान हॉकी संघाला रोखणार नाहीत. वृत्तसंस्था पीटीआयच्या हवाल्याने क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, बहुराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही संघाच्या विरोधात ते नाहीत. हॉकी आशिया कप २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीर येथे होणार आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, ‘भारतात होणाऱ्या बहुराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोणत्याही संघाच्या विरोधात आम्ही नाही, परंतु द्विपक्षीय मालिका ही वेगळी बाब आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांची मागणी आहे की आम्ही कोणालाही स्पर्धेतून वगळू शकत नाही. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, परंतु ते बहुराष्ट्रीय स्पर्धेत खेळतात.’