
भारत तीन बाद १४५, इंग्लंड सर्वबाद ३८७; बुमराहने मोडला कपिलदेवचा विक्रम
लंडन : जो रुटचे ३७ वे कसोटी शतक आणि त्यानंतर जेमी स्मिथ (५१) व ब्रायडन कार्स (५६) यांच्या अर्धशतकांच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात सर्वबाद ३८७ धावा काढल्या. जसप्रीत बुमराह याने १३व्यांदा पाच विकेट घेऊन दिग्गज कपिल देव यांचा विक्रम मोडला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवस अखेर केएल राहुलच्या नाबाद ५३ धावांच्या बळावर तीन बाद १४५ धावा काढल्या आहेत. भारतीय संघ अद्याप २४२ धावांनी पिछाडीवर आहे.
इंग्लंड संघाला ३८७ धावांवर रोखल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या सलामी जोडीने डावाची सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल याने पहिल्याच षटकार ख्रिस वोक्स याला तीन खणखणीत चौकार मारुन सुरेख सुरुवात केली. मात्र, चार वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या जोफ्रा आर्चर याने तिसऱ्या चेंडूवर बाद करुन भारताला पहिला धक्का दिला. यशस्वी जैस्वाल १३ धावांवर तंबूत परतला. त्यानंतर करुण नायर व राहुल या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र, स्टोक्स याने करुण नायरला ४० धावांवर बाद करत ही जोडी फोडली. नायरने चार चौकार मारले.
करुण नायर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती दोन बाद ७४ होती. कर्णधार शुभमन गिल मैदानात उतरला. शुभमन गिल आणि केएल राहुल या जोडीने दमदार फलंदाजी करत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. या मालिकेत धावांचा पाऊस पाडणारा कर्णधार शुभमन गिल हा अवघ्या १६ धावांवर बाद झाला. वोक्स याने गिल याला बाद केले. गिल याने ४४ चेंडूंचा सामना करत दोन चौकारांसह १६ धावा काढल्या. ३४व्या षटकात भारतीय संघाला मोठा धक्का बसला. गिल बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या १०७ होती. जेमी स्मिथ याने यष्टीमागे गिलचा सुरेख झेल घेतला. गिल या मालिकेत पहिल्यांदा स्वस्तात बाद झाला. बाद होण्यापूर्वी गिल याने ६०० धावांचा टप्पा पार केला आहे.
कर्णधार गिल बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या जोडीने चिवट फलंदाजी केली. ऋषभ पंत याने ३३ चेंडूत नाबाद १९ धावा काढल्या. त्याने तीन चौकार मारले. राहुल याने दमदार अर्धशतक ठोकले. राहुलने ११३ चेंडूंचा सामना करत पाच चौकारांसह नाबाद ५३ धावा काढल्या. या जोडीच्या भागीदारीवर बरेच काही अवलंबून आहे. दुसऱ्या दिवसअखेर भारतीय संघाने ४३ षटकात तीन बाद १४५ धावा काढल्या. वोक्स (१-५६), जोफ्रा आर्चर (१-२२) व बेन स्टोक्स (१-१६) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

इंग्लंड सर्वबाद ३८७
तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी इंग्लंडची सुरुवात खराब झाली. बुमराहने पहिल्या सत्रात तीन विकेट घेतल्या. त्याने बेन स्टोक्स (४४), जो रूट (१०४) आणि ख्रिस वोक्स (०) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर जेमी स्मिथ आणि ब्रायडन कार्स या जोडीने संघाची सूत्रे हाती घेतली. आठव्या विकेटसाठी दोघांमध्ये ८० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. ही जोडी सिराज याने फोडली. त्याने जेमी स्मिथला आपला बळी बनवले, जो ५६ चेंडूत ५१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर बुमराहने जोफ्रा आर्चरला बाद करुन इंग्लंडला नववा धक्का दिला. तो फक्त चार धावा करू शकला. भारताविरुद्धच्या पहिल्या डावात ब्रायडन कार्सने आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ८३ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावा केल्या. त्याला सिराजने क्लीन बोल्ड केले. शोएब बशीर एक धाव घेत नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने पाच बळी घेतले तर मोहम्मद सिराज आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. याशिवाय रवींद्र जडेजाने एक बळी घेतला.
बुमराहचे पाच बळी
भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात पाच बळी घेतले. लॉर्ड्सवरील कसोटी सामन्याच्या एका डावात बुमराहने इतक्या विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. लॉर्ड्सवर पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेणारा बुमराह हा भारताचा १५ वा गोलंदाज आहे. त्याचबरोबर, बुमराह परदेशात सर्वाधिक पाच विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. दिग्गजांच्या यादीत सामील झाला
बुमराह लॉर्ड्स मैदानावर पाच विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. बुमराहच्या आधी, मोहम्मद निसार, अमर सिंग, लाला अमरनाथ, विनू मंकड, रमाकांत देसाई, बीएस चंद्रशेखर, बिशन सिंग बेदी, कपिल देव, चेतन शर्मा, वेंकटेश प्रसाद, आरपी सिंग, प्रवीण कुमार, भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांनी असा पराक्रम केला आहे.