
सर्व भारतीय गोलंदाजांना मागे टाकले
लंडन ः लॉर्ड्स कसोटीत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने घातक गोलंदाजी करत पाच विकेट घेतले आणि भारताचा दिग्गज गोलंदाज कपिल देवचा विक्रम मोडला.
जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात शानदार गोलंदाजी केली आणि पाच बळी घेतले. पहिल्या डावात त्याने इंग्लंड संघाला बाद करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अनेक वेळा इंग्लंडच्या फलंदाजांसाठी समस्या निर्माण केल्या. दुसऱ्या कसोटीत बुमराहला विश्रांती देण्यात आली होती, परंतु तिसऱ्या कसोटीत तो परत येताच त्याने आपला लौकिक दाखवला.
कपिल देवचा विक्रम मोडला
जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात २७ षटके गोलंदाजी केली आणि ७४ धावा देऊन पाच बळी घेतले. पाच बळी घेताच त्याने इतिहास रचला. आता तो परदेशी भूमीवर कसोटीत सर्वाधिक पाच बळी घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे आणि त्याने दिग्गज कपिल देवचा विक्रम मोडला आहे. बुमराहने आतापर्यंत परदेशी भूमीवर कसोटीत १३ वेळा पाच बळी घेतले आहेत. तर कपिलने १२ वेळा असे केले होते. आता बुमराहने परदेशातील कसोटी सामन्यात पाच बळी घेण्याच्या बाबतीत सर्व भारतीय गोलंदाजांना मागे टाकले आहे आणि अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये २०० हून अधिक बळी
जसप्रीत बुमराहने २०१८ मध्ये भारतीय कसोटी संघासाठी कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो भारतीय संघाचा एक महत्त्वाचा दुवा बनला आहे. परदेशातील त्याची कामगिरी आणखीनच स्पष्ट होते. त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी ४७ कसोटी सामन्यांमध्ये एकूण २१५ बळी घेतले आहेत. या दरम्यान, त्याने १५ वेळा पाच बळी घेतले आहेत. बुमराहने एकदिवसीय सामन्यात १४९ आणि टी २० क्रिकेटमध्ये ८९ बळी घेतले आहेत.
माझा मुलगा मोठा झाल्यावर..’
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ३१ वर्षीय गोलंदाजाने पहिल्या डावात पाच बळी घेतले. लॉर्ड्सवर पहिल्यांदाच बुमराहने कसोटी सामन्याच्या एका डावात इतक्या बळी घेतल्या आहेत. बुमराहला विचारले गेले की त्याने पाच विकेट घेतल्यानंतर आनंद का साजरा केला नाही, तेव्हा तो म्हणाला, “सत्य हे आहे की मी थकलो होतो. मी २१ वर्षांच्या मुलासारखा उड्या मारू शकत नाही. मी योगदान दिल्याबद्दल मला आनंद आहे. ऑनर्स बोर्डवर नाव पाहून छान वाटले. माझ्या मुलाला तो मोठा झाल्यावर मी हे सांगू शकेन.”
विदेशात पाच विकेट घेणारे भारतीय गोलंदाज
जसप्रीत बुमराह (१३ वेळेस)
कपिल देव (१२ वेळेस)
अनिल कुंबळे (१० वेळेस)
ईशांत शर्मा (९ वेळेस)
रविचंद्रन अश्विन (८ वेळेस)
भागवत चंद्रशेखर (८ वेळेस)
झहीर खान (८ वेळेस)