
विम्बल्डन ः सर्बियन स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच याने निवृत्तीच्या अटकळी फेटाळून लावल्या आहेत आणि स्पष्टपणे सांगितले आहे की तो पुन्हा एकदा विम्बल्डन स्पर्धेत खेळताना दिसेल. जोकोविचने सांगितले की तो या प्रतिष्ठित टेनिस स्पर्धेत किमान एकदा तरी खेळण्याचा मानस आहे. शुक्रवारी यानिक सिनर याने विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत जोकोविचला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता सिनरचा सामना अल्काराजशी होईल.
सेंटर कोर्टवर जागतिक नंबर वन सिनरकडून झालेल्या ६-३, ६-३, ६-४ अशा पराभवामुळे विम्बल्डनमध्ये रॉजर फेडररच्या आठ विजेतेपदांच्या पुरुषांच्या विक्रमाची बरोबरी करण्याचा आणि त्याचे २५ वे ग्रँड स्लॅम जेतेपद जिंकण्याचा जोकोविचचा प्रयत्न चकनाचूर झाला. जोकोविच म्हणाला, ‘मी आज माझी विम्बल्डन कारकीर्द संपवण्याचा विचार करत नाही. मी पुन्हा एकदा तरी परतण्याचा निश्चितच विचार करत आहे.’
जोकोविचला क्वार्टर फायनल सामन्यादरम्यान शेवटच्या सेटमध्ये दुखापत झाली आणि तो उपांत्य फेरीत त्याच्या पूर्ण फॉर्ममध्ये दिसला नाही. जोकोविच म्हणाला, ‘मला माझ्या दुखापतीबद्दल सविस्तर बोलायचे नाही. मी फक्त माझ्या कामगिरीबद्दल बोलू इच्छितो. मी विचार केला होता किंवा अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करू शकलो नाही याबद्दल मी निश्चितच निराश आहे.’
जोकोविचने यावर्षी आतापर्यंत तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे परंतु तो पुढे प्रगती करू शकला नाही. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो दुखापतीमुळे पहिल्या सेटनंतर बाहेर पडला होता, तर फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये सिनेरने त्याला अंतिम फेरीत पोहोचू दिले नाही.