यंदा शालेय क्रीडा हंगाम ९२ खेळांचा रंगणार

  • By admin
  • July 12, 2025
  • 2
  • 555 Views
Spread the love

खेळाडूंच्या वयाची पडताळणी टेस्ट होणार, क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांचे क्रीडा अधिकाऱयांना पत्र 

पुणे ः शासनाच्या क्रीडा विभागातर्फे यंदाच्या शालेय क्रीडा स्पर्धा हंगामात एकूण ९२ क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात येणार असून त्याला मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी वयाची पडताळणी टेस्ट अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्यादृष्टीने विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने संबंधितांना अवगत करणे आवश्यक आहे.

२०२५-२६ क्रीडा हंगामात एकूण ९२ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. ३० मे रोजी संपन्न झालेल्या विभागीय उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या बैठकीत विहीत वेळेत विविध स्तरावरील शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत मौखिक सूचना दिलेल्या आहेत. शासन निर्देशानुसार सर्व ९२ क्रीडा प्रकारांचे नियोजन करावे असे विभागीय क्रीडा उपसंचालक व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना कळवण्यात आलेले आहे. शालेय क्रीडा स्पर्धा या १४, १७, १९ मुले-मुली अशा वयोगटात घेण्यात येणार आहेत. काही खेळांमध्ये एक किंवा दोन वयोगट आहेत. 

शालेय क्रीडा हंगामात एकूण ९२ क्रीडा प्रकार आयोजित केले जाणार आहेत. मात्र, तालुकास्तरावर फक्त १० क्रीडा प्रकार घेतले जाणार आहेत. जिल्हा व विभागीय पातळीवर एकूण ९२ क्रीडा प्रकार घेतले जातील.

विविध स्तरावरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करताना सुयोग्य क्रीडांगण, आवश्यक क्रीडा साहित्य, पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, रुग्णवाहिका व प्रथमोचार साहित्य, तज्ज्ञ पंच व इतर आवश्यक बाबींची उपलब्धता करुन द्यावी अशी सूचना करण्यात आलेली आहे. 

जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेतील पात्र खेळाडूंना क्रीडा गुणांची सवलत देण्यात येत असल्याने तृतीय क्रमांकाचे सामने आयोजित करण्याची दक्षता घ्यावी असे सांगण्यात आले आहे. 

२०२५-२६ पासून भारतीय शालेय खेळ महासंघाने राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱया खेळाडूंना एज व्हेरिफिकेशन टेस्ट अनिवार्य केली आहे. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा व शैक्षणिक संस्थाना अवगत करावे. शालेय व इतर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करताना शासन निर्णय व शासन पत्रांमधील नमूद सर्व अटी, शर्थी तथा सूचनांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी अशा काही सूचना क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिल्या आहेत.

९२ क्रीडा प्रकारांचा समावेश
आर्चरी, अथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, बेसबॉल, बास्केटबॉल, बॉक्सिंग, कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, सायकलिंग, डॉजबॉल, तलवारबाजी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, ज्युदो, कबड्डी, कराटे, खो-खो, किकबॉक्सिंग, लॉन टेनिस, मल्लखांब, नेहरू हॉकी, नेटबॉल, रायफल शूटिंग, रोलबॉल, रोलर स्केटिंग, रोलर हॉकी, शूटिंग बॉल, सॉफ्टबॉल, स्क्वॉश, सुब्रतो मुखर्जी फुटबॉल, जलतरण, डायव्हिंग व वॉटर पोलो, टेबल टेनिस, तायक्वांदो, थ्रोबॉल, व्हॉलिबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वुशू, योगासन, रग्बी, मॉडर्न पेंटॅथलॉन, सेपक टकरॉ, सॉफ्ट टेनिस, टेनिक्वाईट, आट्यापाट्या, आष्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टेंग-सु-डो, फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, मिनी गोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअर बॉल, थाई बॉक्सिंग, हाफ किडो बॉक्सिंग, रोक स्कीपिंग, सिलंबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलिबॉल, थांग-ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, बीच व्हॉलिबॉल, टार्गेटबॉल, टेनिस क्रिकेट, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंन्टाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, शस्त्रांग मार्शल आर्ट, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युझिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट अशा ९२ क्रीडा प्रकारांचा यंदाच्या शालेय क्रीडा हंगामात क्रीडा विभागातर्फे आयोजन करण्यात येणार आहे. 

2 comments on “यंदा शालेय क्रीडा हंगाम ९२ खेळांचा रंगणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *