
अमांडा एकही गेम जिंकू शकली नाही; ११४ वर्षांत हे पहिल्यांदाच घडले आहे
विम्बल्डन : पोलंडच्या इगा स्वीएटेक हिने शानदार कामगिरी करत वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम विम्बल्डनचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. स्वीएटेकने अंतिम फेरीत अमांडा अनिसिमोवाला सलग सेटमध्ये एकतर्फी ६-०, ६-० ने हरवले. अमांडाची कामगिरी इतकी निराशाजनक होती की तिला एकही गेम जिंकता आला नाही. स्वीएटेक ही विम्बल्डन विजेतेपद जिंकणारी पोलंडची पहिली महिला खेळाडू आहे.
सहावा ग्रँड स्लॅम जिंकला
महिलांमध्ये माजी नंबर वन स्वीएटेक हिने आतापर्यंत कधीही विम्बल्डन विजेतेपद जिंकले नव्हते. महिला एकेरी प्रकारात हे तिचे सहावे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. यापूर्वी तिने चार वेळा फ्रेंच ओपन आणि एकदा यूएस ओपन जिंकले होते. स्वीएटेकने २०२०, २०२२, २०२३, २०२४ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०२२ मध्ये यूएस ओपन जिंकले.
अमांडा दबावात
स्वीएटेकने फक्त ५७ मिनिटांत विजेतेपदाचा सामना जिंकला. ११४ वर्षांत पहिल्यांदाच एखाद्या खेळाडूने स्पर्धेच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत एकही गेम जिंकलेला नाही. यासह, मोठ्या विजेतेपद सामन्यांमध्ये स्वीएटेकचा विक्रम ६-० असा झाला आहे. अमांडा सुरुवातीपासूनच सामन्यात आरामदायी दिसत नव्हती आणि तिने २८ अनावश्यक चुका केल्या.