
केएल राहुलचे दहावे शतक, ऋषभ पंत, रवींद्र जडेजाची चमकदार अर्धशतके
लंडन : लॉर्ड्स कसोटीचा तिसरा दिवस शतकवीर केएल राहुल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा यांनी शानदार फलंदाजी करुन गाजवला. भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३८७ धावसंख्या उभारली. इंग्लंड संघाचा पहिला डाव ३८७ धावांवर संपुष्टात आला होता. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज कशी कामगिरी करतात यावर कसोटीचा निकाल अवलंबून आहे. तिसऱ्या दिवशीच्या एक षटकाच्या खेळात इंग्लंडने बिनबाद २ धावा काढल्या आहेत. बेन डकेट व झॅक क्रॉली या सलामी जोडीने डावाची सुरुवात केली. परंतु, क्रॉली याने वेळकाढूपणाचा कळस गाठला. भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवून नाराजी व्यक्त केली.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळला जात आहे. या सामन्यात के एल राहुलने भारताकडून शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आहे. लॉर्ड्स मैदानावर केएल राहुलचे हे दुसरे शतक आहे. या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमधील राहुलचे हे दहावे शतक आहे. लॉर्ड्सवर भारतीय फलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे. त्यांनी येथे तीन शतके झळकावली आहेत.
सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत राहुलने शानदार फलंदाजी केली आहे. या कसोटी मालिकेतील केएल राहुलचे हे दुसरे शतक आहे. यापूर्वी, लीड्स येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने शानदार शतक झळकावले होते. तेथे त्याने दुसऱ्या डावात २४७ चेंडूत १३७ धावा केल्या. लॉर्ड्सवर शतक झळकावल्याने तो या मैदानावर २ कसोटी शतके झळकावणारा पहिला आशियाई सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी २०२१ मध्ये राहुलने याच मैदानावर शतक झळकावले होते. तिथे त्याने १२९ धावांची खेळी खेळली. राहुलचे इंग्लंडमधील हे चौथे शतक आहे. २००० नंतर इंग्लंडमध्ये कोणत्याही सलामीवीराने केलेले हे दुसरे सर्वाधिक शतक आहे. यापूर्वी ग्रॅमी स्मिथने पाच शतके झळकावली होती.
शतक झळकावल्यानंतर बाद
केएल राहुल त्याचे शतक पूर्ण केल्यानंतर लगेचच बाद झाला. त्याने १७७ चेंडूत १०० धावा केल्या. शोएब बशीरने त्याची विकेट घेतली. राहुल बाद होण्यापूर्वी भारताने ऋषभ पंतच्या रूपात चौथी विकेट गमावली होती. पंत दुर्देवीरित्या धावबाद झाला. पंत याने ११२ चेंडूंचा सामना करत ७४ धावांची दमदार खेळी केली. त्याने दोन षटकार व आठ चौकार मारले. पंत व राहुल या जोडीने चौथ्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी करुन डावाला आकार दिला. पंत बाद झाल्यानंतर राहुल देखील शतक साजरे करुन तंबूत परतला.
राहुल व पंत ही जमलेली जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा व नितीन कुमार रेड्डी या जोडीने सहाव्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी केली. या भागीदारीने भारतीय संघ सुस्थितीत पोहोचला. नितीनकुमार रेड्डी याने ३० धावा फटकावल्या. त्यानंतर रवींद्र जडेजा १३१ चेंडूंत ७२ धावांची चिवट व जिद्दी अर्धशतकी खेळी करुन बाद झाला. जडेजाने ८ चौकार व १ षटकार मारला. आकाश दीप एक षटकार ठोकत ७ धावांवर बाद झाला. जसप्रीत बुमराह (०) बाद झाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने ७६ चेंडूत २३ धावांची चिवट खेळी केली. जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात सुंदर २३ धावांवर बाद झाला. सिराज (०) नाबाद राहिला. सुंदर बाद झाल्यामुळे भारताचा डाव ११९.२ षटकात ३८७ धावांवर संपुष्टात आला.
इंग्लंडच्या ख्रिस वोक्स याने ८४ धावांत तीन विकेट घेतल्या. जोफ्रा आर्चर (२-५२), बेन स्टोक्स (२-६३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. कार्से (१-८८) व बशीर (१-५९) यांनी एक बळी मिळवला.