
बटुमी (जॉर्जिया) ः फिडे जागतिक महिला बुद्धिबळ कप स्पर्धेत अनुक्रमे रशियाच्या कॅटेरिना लॅग्नो आणि सर्बियाच्या थियोडोरा इंझाकचा पराभव करून भारतीय ग्रँडमास्टर अवंतिका अग्रवाल आणि दिव्या देशमुख यांनी तिसऱ्या फेरीतील पहिले गेम जिंकून प्री-क्वार्टर फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.
बाद फेरीत फक्त ३२ सहभागी उरले आहेत. वंतिका अग्रवाल हिने उच्च दर्जाच्या लॅग्नोवर विजय मिळवला हे भारतीय महिलांमध्ये तिच्या वेगाने वाढणाऱ्या प्रतिष्ठेचे आणखी एक संकेत आहे. विजेतेपदाची दावेदार दिव्या देशमुख हिने अपेक्षा पूर्ण केल्या आणि काळ्या मोहऱ्यांनी थियोडोराला पराभूत केले.
दरम्यान, भारताच्या अव्वल मानांकित कोनेरू हम्पी हिला पोलंडच्या कुलोन क्लाउडियासोबत बरोबरीवर समाधान मानावे लागले. पांढऱ्या मोहऱ्यांसह निकाल थोडा निराशाजनक होता कारण तिला जिंकण्याची अपेक्षा होती. डी हरिका देखील जिंकू शकली नाही आणि तिने त्सोलाकिडो स्टॅव्ह्रोलासोबत बरोबरी साधली. आर वैशाली हिने अमेरिकेच्या कॅरिसा यिपसोबत बरोबरी साधली.