
रिययल माद्रिद संघाचा ४-० ने पराभव, रुईझने सर्वाधिक दोन गोल
नवी दिल्ली ः पीएसजी संघ फिफा क्लब वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यांनी उपांत्य फेरीत स्पेनच्या दिग्गज फुटबॉल क्लब रियल माद्रिद संघाचा ४-० असा पराभव केला. फॅबियन रुईझने सर्वाधिक २ गोल केले. आता पीएसजी अंतिम फेरीत चेल्सी संघाचा सामना करेल. चेल्सी फ्लुमिनेन्सला हरवून जेतेपदाच्या सामन्यात पोहोचला. अंतिम सामना ईस्ट रदरफोर्ड येथील मेटलाइफ स्टेडियमवर खेळला जाईल.
पीएसजीचा माद्रिदवर एकतर्फी विजय
या वर्षी यूईएफए चॅम्पियन्स लीग जिंकणाऱ्या पीएसजी संघाने संपूर्ण सामन्यात रियल माद्रिदला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. संघाने सुरुवातीला स्पॅनिश दिग्गजांवर पकड मिळवली होती. सामन्याच्या सहाव्या मिनिटाला रुईझने गोल करून पीएसजी संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर डेम्बेलेने नवव्या मिनिटाला गोल करून आघाडी दुप्पट केली. पहिल्या १० मिनिटांत दोन गोल गमावल्यानंतर, रिअल माद्रिदचा संघ स्तब्ध झाला. संघाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, परंतु अनेक संधी गमावल्या. रुईझने २४ व्या मिनिटाला पुन्हा गोल केला आणि पीएसजीला ३-० ने आघाडी मिळवून दिली. पीएसजीचा संघ हाफ टाईमपर्यंत ३-० ने आघाडीवर होता. हाफ टाईमनंतर, पीएसजीने बचावावर अधिक लक्ष केंद्रित केले. माद्रिदचा संघ इच्छा असूनही काहीही करू शकला नाही. ८७ व्या मिनिटाला गोंकालो रामोसने गोल केला आणि पीएसजीला ४-० ने आघाडी मिळवून दिली आणि संघाचा विजय जवळजवळ निश्चित केला.
पेड्रोच्या दोन गोलसह चेल्सी १३ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला
यापूर्वी, युरोपियन क्लब चेल्सी १३ वर्षांनंतर क्लब वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला. क्लबने गेल्या वेळी उपविजेत्या फ्लुमिनेन्सला उपांत्य फेरीत २-० ने हरवले. या सामन्याचा नायक २३ वर्षीय जोआओ पेड्रो होता ज्याने पहिल्यांदा चेल्सी संघासाठी गोल केला. दोन्ही गोल त्याने केले. पहिल्या सत्रात १८ व्या मिनिटाला त्याने पहिला गोल केला. त्याचवेळी, ५६ व्या मिनिटाला एन्झो फर्नांडिसच्या मदतीने तो दुसरा गोल करण्यात यशस्वी झाला. या स्पर्धेत एखाद्या खेळाडूने त्याच्या जुन्या क्लबविरुद्ध (२०१९-२०२०) गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता चेल्सीचे लक्ष पहिल्या जेतेपदावर असेल कारण २०१२ मध्ये ते पहिल्यांदाच क्लब विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचले होते परंतु ब्राझिलियन क्लब करिंथियन्सकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
ब्राझिलियन क्लब बोटाफोगोने ब्राझीलच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक कार्लो अँसेलोटीच्या मुलाला त्याचे नवे व्यवस्थापक म्हणून नियुक्त केले आहे. ३५ वर्षीय डेव्हिड अँसेलोटी यांना २०२६ पर्यंत करार देण्यात आला आहे. हा त्यांचा पहिला पूर्णवेळ प्रशिक्षक करार आहे. क्लब विश्वचषकात संघ अंतिम १६ मधून बाहेर पडल्यानंतर बोटाफोगोचे मालक जॉन टेक्स्टर यांनी माजी प्रशिक्षक रेनाटो पायवा यांना काढून टाकले.