
तो लवकरच बरा होईल – प्रशिक्षक अमरीश कुमार
नवी दिल्ली ः दोन दिवसांपूर्वी मोनाको डायमंड लीग दरम्यान पडल्यामुळे अनुभवी भारतीय स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याला दुखापत झाली होती. आता त्याच्या दुखापतीबद्दल प्रशिक्षक अमरीश कुमार यांचे विधान आले आहे. त्यांनी सांगितले की साबळे याला किरकोळ दुखापत झाली आहे. तो लवकरच बरा होईल.
आशियाई क्रीडा स्पर्धेचा विजेता आणि राष्ट्रीय विक्रमधारक अविनाश साबळे शुक्रवारी पुरुषांची ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धा पूर्ण करू शकला नाही. कारण शर्यतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात पाण्यात उडी मारताना तो पडला. शर्यतीतून बाहेर पडताना तो गुडघ्याच्या मागून मांडीचा खालचा भाग धरून बसलेला दिसला.
पुणे येथील मिलिटरी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये काम करणारे अमरीश कुमार यांनी पीटीआयला सांगितले की, ‘साबळे यांना गुडघ्याभोवती किरकोळ दुखापत झाली आहे. तो विश्रांती घेईल आणि जास्तीत जास्त एक-दोन आठवड्यात तो बरा होईल. काळजी करण्यासारखे काही नाही. साबळे पाण्याचा अडथळा ओलांडणाऱ्या धावपटूला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. असे करताना तो स्वतः पडला. शर्यतीत अशा घटना घडत राहतात.’
२०१२ मध्ये भारतीय सैन्यात सामील झाल्यानंतर अमरीश कुमारने साबळेची प्रतिभा ओळखली आणि २०१७ मध्ये क्रॉस कंट्रीमधून स्टीपलचेसमध्ये भाग घेण्यास सांगितले आणि त्याला अव्वल खेळाडू बनवले. या हंगामात तीन क्रॉस कंट्री स्पर्धांमध्ये त्याचा फक्त एक गुण आहे, ज्यामुळे ३० वर्षीय साबळेला २७-२८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे होणाऱ्या क्रॉस कंट्री फायनलमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल.