
‘कबड्डीतील किमयागार’ पुस्तक प्रकाशानात शरद पवारांची घोषणा
मुंबई ः एकेकाळी महाराष्ट्र आणि मुंबईच्या कबड्डी संघटनेचा नावलौकिक संपूर्ण देशात होता, आज मात्र माझ्या कानावर काही गोष्टी ऐकू येतात, त्या चिंता करण्याजोग्या आहेत. संघटना मुठीत ठेवण्यासाठी दुर्दैवाने चुकीचा रस्ता स्वीकारलाय की काय असे चित्र दिसत आहे. त्यामुळे खेळाडूंना सर्वात जास्त किंमत चुकवावी लागत आहे, हे ऐकल्यानंतर यामध्ये मी लक्ष घालण्याची वेळ आली आहे, या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो आहे; असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत व्यक्त केले.
विनायक दळवी लिखित कबड्डीतील किमयागार या संदर्भ ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना शरद पवार बोलत होते. त्याप्रसंगी अनेक राष्ट्रीय खेळाडू उपस्थित होते. त्यामध्ये अर्जुन पुरस्कार विजेते सदानंद शेट्टी, शांताराम जाधव, राजू भावसार, अशोक शिंदे, माया आकरे यांचा समावेश होता. तर राष्ट्रीय खेळाडूंमध्ये आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडूंमध्ये चित्रा नाबर, शैला रायकर, ग्रेटा डिसोजा, सुनील जाधव, जेम्स परेरा, विजया शेलार, सागर बांदेकर आदी आजी-माजी राष्ट्रीय कबड्डीपटू देखील उपस्थित होते. उपस्थितांमध्ये भारताचे ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे तसेच उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय टिपसे, बीसीसीआयचे माजी सीईओ रत्नाकर शेट्टी आणि शरीर संस्थापटू विकी गोरक्ष हे मान्यवर देखील उपस्थित होते.
आपला मुद्दा अधिक विस्तृतपणे मांडताना शरद पवार म्हणाले, “मला आनंद आहे की, हा खेळ सुधारतोय. पण अलीकडेच मला काही गोष्टी ठीक ऐकायला मिळत नाहीत. दुर्दैवाने संघटनेमध्ये काहीतरी चुकते आहे, चुकीचा रस्ता काही लोकांनी स्वीकारला की काय? असं चित्र दिसतंय. मात्र त्यामुळे सगळ्यात जास्त किंमत ही खेळाडूंना द्यावी लागते. कबड्डी खेळ विस्तारित होतोय. त्यामध्ये नवीन एक तंत्र पुढे आलेलं आहे. आज टेलिव्हिजनमध्ये ते तंत्र आपल्याला बघायला मिळते. त्याच्यामधून खेळाडूंना कदाचित काही मदत होत असेल. पण मूळ कबड्डी हा खेळ जो आहे तसाच आहे. त्याच्यातील जे कसब आहेत, त्याच्यावर कुठेतरी आक्रमण होतंय की काय? असं त्या ठिकाणी दिसतंय. म्हणून याच्यात लक्ष घालावं लागेल. मी जाहीरपणाने कबूल करतो की, अलीकडे माझं लक्ष या कामात नव्हतं. पण एकंदर चित्र ऐकल्यानंतर याच्यात लक्ष घालण्याची वेळ आलेली आहे आणि कबड्डीला जुने दिवस कसे येतील? याची काळजी ही घ्यावी लागेल, या निष्कर्षाशी मी आलो आहे.
ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संपादक तसेच माजी खासदार कुमार केतकर यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की पुस्तकाचे नाव किमयागार असे वाचताक्षणी माझ्या लक्षात आले की, यामध्ये शरद पवार यांचा देखील समावेश असणार. त्यांनी या पुस्तकाचे लेखक दळवी तसेच प्रकाशक अश्विनी कुमार मोरे व आत्माराम मोरे प्रतिष्ठान आणि लीलाधर चव्हाण यांचे आभार मानले.
कबड्डीतील किमयागार या संदर्भ ग्रंथाच्या संदर्भ ग्रंथाचे लेखक विनायक दळवी यांनी, पुढील आवृत्तीत आणखी काही दर्जेदार खेळाडूंचा समावेश करून, संदर्भ ग्रंथ अधिक समृद्ध करण्यात येईल अशी ग्वाही दिली. आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अश्विनी कुमार मोरे यांनी यावेळी, कबड्डी आणि देशी खेळांच्या प्रचार प्रसाराची आपल्या वडिलांची परंपरा आपण वेगळ्या पद्धतीने पुढे कायम ठेवली आहे असे सांगितले. सदर प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन माजी राष्ट्रीय कबड्डीपटू आणि माजी प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांनी आपल्या खास खुमासदार शैलीत केले.