
१७ वर्षाखालील मुलींच्या गटात हिरानंदानी स्कूलला विजेतेपद
ठाणे ः ठाणे जिल्ह्यात आयोजित सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत वसंत विहार हायस्कूल संघाने दुहेरी मुकुट पटकावला. हिरानंदानी स्कूल संघाने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले.
ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ठाणे महानगरपालिका क्रीडा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सुब्रोतो मुखर्जी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा ठाण्यातील मौलाना अब्दुल कलाम आझाद स्टेडियम, मुंब्रा येथे उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील एकूण ७४ संघांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये १५ व १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या गटांचा समावेश होता.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे मुंबई विभाग संपर्क प्रमुख आणि जिल्हाध्यक्ष प्रा प्रमोद वाघमोडे, क्रीडा समन्वयक शंकर बरकडे, क्रीडा शिक्षक नामदेव पाटील, निखिल गावडे, अन्वर खान, स्पर्धा सहाय्यक सीमा शिंदे व विविध शाळांचे शिक्षक व प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व विजेत्या संघांना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आकर्षक प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि क्रीडाभावना यांचे दर्शन घडवले. ही स्पर्धा केवळ विजयासाठी नव्हे, तर खेळातील मूल्यांचा सन्मान करणारी ठरली. या स्पर्धेतील विजेत्यांचे मुंबई संपर्क प्रमुख प्रमोद वाघमोडे यांनी अभिनंदन केले आहे.
स्पर्धेचा अंतिम निकाल
१५ वर्षाखालील मुलांचा गट ः विजेता संघ : वसंत विहार हायस्कूल, उपविजेता संघ : हिरानंदानी स्कूल, तृतीय क्रमांक : सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल.
१७ वर्षाखालील मुलांचा गट : विजेता संघ: वसंत विहार स्कूल, उपविजेता संघ : हिरानंदानी स्कूल, तृतीय क्रमांक : क्वीन्स मेरी स्कूल.
१७ वर्षाखालील मुलींचा गट : विजेता संघ: हिरानंदानी स्कूल, उपविजेता संघ : डीएव्ही पब्लिक स्कूल, तृतीय क्रमांक : न्यू होरायझन रोडस स्कूल.