
मुंबई : माटुंगा येथील खालसा महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय तायक्वांदोपटू शिवम शेट्टीची जर्मनीत बुधवारपासून सुरू होत असलेल्या विश्व विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
हा बहुमान मिळवणारा शिवम हा मुंबई विद्यापीठाचा पहिला खेळाडू आहे. तसेच या स्पर्धेसाठी निवड झालेला महाराष्ट्रातील देखील तो एकमेव आहे. या स्पर्धेची निवड चाचणी पंजाब, अमृतसर येथील गुरुनानक देव विद्यापीठात झाली. त्यात शिवमने ६३ किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवले होते. राजेश मुराव त्याचे प्रशिक्षक आहेत.
पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ शिवम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धात भाग घेत आहे. त्याने विविध स्पर्धात पन्नासपेक्षा जास्त पदके पटकावली आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धात त्याचा नावावर पाच सुवर्ण पदकाची नोंद आहे. सध्या खालसा महाविद्यालयातुन तो एम ए करत आहे. त्याच्या निवडीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या रत्ना शर्मा आणि स्पोर्ट्स डायरेक्टर जसबीर कौर यांनी त्याचे खास अभिनंदन करुन त्याला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.