
२० ते २९ जुलै २०२८ या कालावधीत होणार सामने
न्यूयॉर्क ः १२८ वर्षांनंतर २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट परतणार आहे. चाहते या बहुप्रतिक्षित पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता होणाऱ्या सामन्यांच्या तारखांबाबत माहिती समोर आली आहे. १२ जुलै २०२८ पासून लॉस एंजेलिसपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेल्या पोमेना शहरातील फेअरग्राउंड्स स्टेडियममध्ये क्रिकेट सामने खेळले जातील. त्याचे पदक सामने २० आणि २९ जुलै २०२८ रोजी खेळले जातील.
स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार, बहुतेक दिवशी दोन सामने खेळले जातील, तर १४ आणि २१ जुलै रोजी एकही सामना होणार नाही. गेल्या वर्षी, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने २०२८ च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये क्रिकेट, बेसबॉल/सॉफ्टबॉल, फ्लॅग फुटबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅशचा समावेश करण्यास मान्यता दिली.
१९०० मध्ये क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग होता
१९०० मध्ये पॅरिस ऑलिम्पिकचा भाग म्हणून क्रिकेटचा समावेश होता. त्यानंतर ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात दोन दिवसांचा सामना खेळला गेला होता. आता तो अनधिकृत चाचणी म्हणून गणला जातो. तथापि, लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये सहा संघ टी-२० स्वरूपात खेळताना दिसतील. इतकेच नाही तर आयोजकांनी एका संघात जास्तीत जास्त खेळाडूंची संख्या देखील निश्चित केली आहे. आयोजकांनी म्हटले आहे की एका संघात १५ खेळाडू असतील. पुरुष आणि महिला दोन्ही प्रकारांमध्ये जास्तीत जास्त ९० खेळाडूंचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच सहा संघांमध्ये जास्तीत जास्त ९० खेळाडू असतील. म्हणजेच, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपातील टी-२० मध्ये एकूण सहा संघ आणि पुरुष आणि महिला श्रेणीतील १८० खेळाडू सहभागी होतील.
आयसीसीचे १२ नियमित सदस्य
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सध्या १२ नियमित आणि ९४ सहयोगी सदस्य आहेत. नियमित सदस्यांमध्ये अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि झिम्बाब्वे या संघांचा समावेश आहे. तथापि, २०२८ च्या ऑलिंपिकसाठी पात्रता प्रक्रिया अद्याप सांगण्यात आलेली नाही. असे मानले जाते की अमेरिका त्यात खेळेल, कारण त्यांना यजमान कोट्याचा फायदा मिळेल. याचा अर्थ असा की अमेरिकेव्यतिरिक्त, आणखी पाच संघ सहभागी होऊ शकतील आणि त्यांना पात्रता प्रक्रियेतून जावे लागू शकते.