
सोलापूर ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या डी बी देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेत सदानंद मोहोळ संघाने विजेतेपद पटकावले.
सोलापूर येथील प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियम आणि दयानंद कॉलेज मैदानावर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित आणि सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेच्या सौजन्याने पहिल्या वहिल्या डी बी देवधर चषकाचा मानकरी सदानंद मोहोळ इलेव्हन संघ ठरला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश भुतडा यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी एमसीए वरिष्ठ गट निवड समिती प्रमुख अक्षय दरेकर, सदस्य रोहित जाधव, सलील आगरकर, सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु, राजेंद्र गोटे व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दोन्ही संघाचे प्रशिक्षक तसेच पंच, गुणलेखक आणि संयोजन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर सदानंद मोहोळ संघाने २ बाद २० वरून डाव पुढे सुरू केल्यावर जेवणाला खेळ थांबला तोपर्यंत ४ बाद ११० (२८ षटके) धावा केल्या, त्यात यश क्षीरसागर याने संयमी अर्धशतक लगावले तर सचिन धस सोबत ५५ धावांची भागीदारी केली. सचिन धस बाद झाल्यानंतर मेहुल बाद झाला आणि त्यानंतर पुन्हा खेळ सुरू होऊउ शकला नाही व सामना अनिर्णित अवस्थेत संपला. पहिल्या डावाच्या आघाडीवर हेमंत कानिटकर संघ विजयी ठरला.
दयानंद कॉलेजच्या मैदानावर ८ बाद १५० वरून पुढे खेळताना सदू शिंदे संघ १९३ धावांपर्यंतच मजल मारू शकला, २४१ धावांची आघाडी मिळवत वसंत रांजणे संघाने पुन्हा फलंदाजी करत लंचपर्यंत ११ षटकात ५७ धावा केल्या आणि चहापानाला खेळ थांबला तेव्हा ३ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्यात सलामीला ८० धावा करताना अनिरुद्ध साबळे याने पुन्हा अर्धशतक लगावले आणि तिसरा गडी किरण बाद होईपर्यंत चोरमलेने जय पांडे सोबत ६४ धावांची भागीदारी केली. त्यापुढे खेळ होऊ शकला नाही आणि सामना अनिर्णित अवस्थेत संपला व पहिल्या डावाच्या आघाडीवर वसंत रांजणे इलेव्हन संघ विजयी ठरला.