
नंदुरबार ः नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार यांच्या क्रीडांगणावर महाराष्ट्र राज्य कबड्डी दिनानिमित्त आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य पुष्पेन्द्र रघुवंशी यांच्या हस्ते कबड्डी मैदान पूजन व नारळ फोडून करण्यात आले. कार्यक्रमास पर्यवेक्षक विलास पाटील, क्रीडा शिक्षक डॉ मयुर ठाकरे, प्रवीण मोरे, रामप्रसाद पाटील, सोनिया पाडवी, स्मिता दिघे, मंगला माळी, सावित्री वळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ मयुर ठाकरे यांनी कबड्डीच्या शारीरिक व मानसिक फायद्यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “निरोगी शरीरासाठी कोणताही खेळ आवश्यक असून, शालेय जीवनात खेळाशी नाते दृढ असावे,” असे त्यांनी नमूद केले. प्राचार्य रघुवंशी सरांनी विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याचे महत्व सांगितले.
या स्पर्धेत इयत्ता सातवी-आठवी (बालगट) व नववी-दहावी (मोठा गट) यांच्यात सामने घेण्यात आले. विजेत्या खेळाडूंना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. पंच म्हणून नकुल चौधरी, प्रदीप माळी, आकाश माळी व मयूर पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.