
मुंबई ः कबड्डी दिनाचे औचित्य साधून नागरिक सहाय्य केंद्रातर्फे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत इनडोअर पाच-पाच चढायांच्या एलआयसी-आत्माराम मोरे चषक शालेय कबड्डी स्पर्धेत श्री हशू अडवाणी मेमोरियल स्कूल-गोवंडी संघाने अजिंक्यपद पटकाविले.
चढाईपटू अर्णव बावस्कर, मयुरेश सावंतच्या चढाया व महेश रायच्या बहारदार पकडीच्या बळावर हशू अडवाणी स्कूलने बलाढ्य यजमान ज्ञानेश्वर विद्यालयाचा चुरशीच्या लढतीत १४-१० गुणांनी पराभव केला.पहिल्या डावात ७-६ अशी आघाडी घेऊनही ज्ञानेश्वर विद्यालय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने वडाळा येथील ज्ञानेश्वर विद्यालय सभागृहामध्ये मॅटवर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ज्ञानेश्वर विद्यालयाने रोझरी हायस्कूलचा १५-१३ असा तर हशू अडवाणी स्कूल संघाने आर.एन. विद्यालय-दिवा संघाचा १८-१२ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक दिली. स्पर्धेमध्ये समता विद्यामंदिर-घाटकोपर, ताराबाई मोडक हायस्कूल-दादर, सीताराम प्रकाश हायस्कूल-वडाळा व डिसोझा हायस्कूल-भायखळा संघांनी उपांत्यपूर्व उपविजेतेपद पटकाविले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एलआयसीचे व्यवस्थापक मनीष तिवारी, आत्माराम मोरे प्रतिष्ठानचे विश्वस्त विराज मोरे, नागरिक सहाय्य केंद्राचे सेक्रेटरी सुर्यकांत कोरे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, रमाकांत शिंदे, महेंद्र पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाला. कबड्डी प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, एकनाथ सणस, प्रॉमिस सैतवडेकर, अविनाश महाडिक, सुनील खोपकर यांनी स्पधेच्या दरम्यान शालेय खेळाडूंना मार्गदर्शन केले.