
पुणे ः युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये शिवकालीन १२किल्ल्यांचा समावेश झाला आहे. ही बाब सर्व भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. जुलै २०२४ मध्ये दिल्लीतील भारत मंडपम येथे ४६व्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीच्या दहा दिवस चाललेल्या अधिवेशनात या १२ किल्ल्यांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्याचाच एक भाग म्हणून अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे तयार केलेल्या बाराही किल्ल्यांचे टू द स्केल मॉडेल तेथे प्रदर्शित करण्यात आले होते. संपूर्ण जगभरातून सुमारे १००० हून अधिक सदस्य या अधिवेशनामध्ये सहभागी झाले होते. किल्ल्यांचे हे टू द स्केल मॉडेल्स बघून हे सर्व सदस्य अत्यंत प्रभावी झाले होते.
महासंघातर्फेसिंधुदुर्ग व विजयदुर्ग या दोन किल्ल्यांचे मॉडेल आर्किटेक्ट राजन बागवे व अपर्णा भट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम २०२२ मध्ये सांगलीत रमेश बालुर्गी यांच्याकडे तयार करण्यात आले होते. मागील वर्षी विधान भवनामध्ये या दोन प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ती मॉडेल्स सांस्कृतिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नजरेत भरली.

किल्ले प्रतिकृतींची ही कल्पना युनेस्कोच्या दिल्ली अधिवेशनात मोठा प्रभाव पाडू शकतील या भावनेतून इतर १० किल्ल्यांच्याही प्रतिकृती तयार करण्याची जबाबदारी महासंघाला देण्यात आली. त्यानंतर महासंघांच्या कार्यकर्त्यांनी उर्वरित १० किल्ल्यांच्या कामाला सुरुवात केली.
सर्व किल्ल्यांचे प्रमाणबद्ध नकाशे करण्याचे काम ड्रोन आणि कंटूर मॅप यांच्या सहाय्याने करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक किल्ल्याला भेट देऊन तट, बुरुजसह सर्व वास्तूंचे मोजमाप घेण्यात आले. पडलेल्या वास्तूंचे आराखडे तयार करण्यात आले. ही सर्व तांत्रिक माहिती महासंघाच्या किल्ले अभ्यासक टीमने तयार केल्यावर त्यानुसार किल्ले मॉडेल करायला सुरुवात झाली.
कलाकार रमेश बालुर्गी यांनी यातील एकही किल्ला पाहिलेली नव्हता. त्यामुळे पहिल्या दोन मॉडेलच्या कामासाठी सतत सांगलीला जाऊन त्यांच्यासोबत काम करावे लागले होते. त्यानंतर पुढील १० किल्ल्यांचे मॉडेल तयार करण्याचे काम मुंबईत महाराष्ट्र सेवा संघाच्या मुलुंडच्या सभांगणात सुरू झाले आणि महासंघाच्या शिलेदारांनी रमेश बालुर्गी व कमर्शियल आर्टिस्ट रमेश बोरवणकर यांना बरोबर घेऊन अडीच महिन्यात रात्रंदिवस मेहनत करून पूर्ण केले. यात श्रीधर दळवी, राजेश पेडणेकर, रमेश भिडे, शिवाजी गुराम, प्रसाद गोगटे, संजय नेवे, भरत यादव, विनोद म्हात्रे, मंगेश कदम, नृपेंद्र पोळ अशा अभ्यासक टीमने मॉडेलचा सांगाडा तयार करणे, त्याच्यावर लेप देऊन त्याला आकार देणे, तट-बुरूज उभारणे अशी महत्वाची व वेळखाऊ कामे रात्रंदिवस मेहनत करून बालुर्गींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली. त्यानंतर किल्ल्यातील सदर, घरे, वाडे अशा वास्तू व सर्व रंगरंगोटी बालुर्गी यांनी केली. अशाप्रकारे सर्व टीमच्या एकत्रित योगदानातून आणि ह्रषीकेश यादव यांच्या नेतृत्वाखाली मॉडेल तयार करण्यात आले.
यानंतर या प्रतिकृती तीन मोठ्या कंटेनरमधून अत्यंत सुरक्षितपणे दिल्ली येथे नेऊन तेथील अधिवेशनामध्ये अत्यंत प्रभावीपणे सादर केल्या गेल्या. या अधिवेशनामध्ये सहभागी झालेल्या सर्व सदस्यांनी या प्रतिकृतींचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले व इतक्या कमीवेळेत इतके प्रभावी काम पाहून कौतुकही केले. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांच्यासह माधव फडके, किरण देशमुख यांनी या प्रतिकृती बनवण्यात मोलाची भूमिका बजावली.
नुकतेच युनेस्को हेडक्वार्टर पॅरिस येथे पार पडलेल्या जागतिक वारसा समितीच्या ४७व्या अधिवेशनात भारतातील हे १२ किल्ले जागतिक वारसास्थळ यादीत समाविष्ट झाल्याचे घोषित करण्यात आले. हे कार्य पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागासोबतच अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने तयार केलेल्या टू द स्केल मॉडेलची छाप सर्वांच्या हृदयावर पडली. यासाठी सर्व गिर्यारोहक स्वयंसेवकांचे योगदान हे अत्यंत मौल्यवान असल्याचे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे यांनी सांगितले.