
मुंबई ः प्रतिष्ठा फाउंडेशन आणि गुरुवर्य सेवा प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुवर्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ चे आयोजन राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक, कोल्हापूर येथे करण्यात आले होते. या वेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवण्यात आले. त्यामध्ये मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे सर्वेसर्वा वसंतराव पाटील यांना गुरुवर्य मल्लगुरू पुरस्कार २०२५ खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व शिक्षण तज्ञ डॉ अभय कुमार साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी शिक्षण रत्न पुरस्कार प्राप्त डॉ आर एस साळुंखे, उद्योग रत्न पुरस्कार प्राप्त प्रशांत आनंदराव पाटील, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त प्रतापराव शिवाजीराव मोहिते पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पैलवान नजरुद्दीन नायकवडी व प्रतिष्ठा फाऊंडेशनचे सर्वेसर्वा तानाजी राजे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रियांका भगत, नीता मोरे, नलिनी पाटील यांना देखील क्रीडा रत्न पुरस्कार देण्यात आला. वसंतराव पाटील हे गेली चार दशके कुस्ती खेळात कार्यरत असून अनेक युवा मल्ल घडवण्याचे त्यांचे कार्य सुरू आहे.
वसंतराव पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल आखाड्यातील सर्व पैलवान , पालक, पदाधिकारी तसेच समस्त भाईंदर वासियांतर्फे त्यांचे खास अभिनंदन.करण्यात येत आहे.