
वैष्णवी पाटीलचा सहभाग
पुणे ः युरोपातील बल्गेरिया येथे झालेल्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना पुण्याच्या मनस्वी कांबळे हिने रौप्यपदक पटकावले तर वैष्णवी पाटील हिने सहभाग नोंदवला. खेळाडूंची ही कामगिरी कुडो महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.

युरोपात झालेल्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कुडो इंडिया संचालक अक्षय कुमार आणि कुडो इंडिया संस्थापक मेहुल वोरा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातून एकूण ५९ खेळाडू युरोप येथे स्पर्धेला गेले होते. त्यात पुणे जिल्हा कुडो संघटनेच्या मनस्वी कांबळे हिने देशाचे प्रतिनिधित्व करून कुडो वर्ल्ड कप स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. तसेच वैष्णवी पाटील हिने सहभाग घेऊन महाराष्ट्र राज्याचा झेंडा सातासमुद्रा पलीकडे अटकेपार रोवला आहे.
या खेळाडूंना विस्पी खराडी यांच्या मार्फत गुजरात येथे १३ दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. मनस्वी आणि वैष्णवीच्या ऐतिहासिक विजयाकरिता प्रशिक्षक किशोर शिंदे आणि पुणे जिल्हा कुडो संघटना अध्यक्ष अरविंद मोरे यांनी अभिनंदन केले आहे.