
मुंबई ः आयईएस ओरियन स्कूल हिंदू कॉलनीतर्फे शाळेच्या वास्तूमध्ये आयसीएसई अ विभागाची शालेय कॅरम स्पर्धा संपन्न झाली. मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विविध शाळेतील एकूण ६९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
१४ वर्षांखालील मुलींमध्ये अंतिम सामन्यात जे बी वाच्छा शाळेच्या गौरी सावंत हिने त्यांच्याच शाळेतील माही राऊतचा सहज पराभव केला. या गटात तिसरा क्रमांक प्राप्त करताना गुंडेचा एज्युकेशन अकादमीच्या श्रुती सुवर्णाने अभय इंटरनॅशनल शाळेच्या ओवी तंबाकूवर मात केली.
मुलांच्या १४ वर्षांखालील गटात अंतिम सामन्यात कोहिनूर इंटरनॅशनल स्कूलच्या चैतन्य दरेकर याने त्यांच्या शाळेच्या चिन्मय दरेकरला चुरशीच्या लढतीत पराभूत केले. या गटातील तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेच्या शर्विल सोनाराने श्री श्री रविशंकर शाळेच्या हर्ष ठक्कर याला हरवले.
१७ वर्षाखालील मुलींमध्ये अंतिम विजेतेपद पटकावताना आयोजक आयईएस ओरियन शाळेच्या विहा कामतने आपली शाळेतील सहकारी अंतरा उदगिरीला नमवले. या गटात तिसरा क्रमांक प्राप्त करताना आयईएस ओरियन शाळेच्या अदिती साळुंखे हिने जे बी वाच्छा शाळेच्या रूपवर मात केली.
१७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम फेरीत श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेच्या आरव मानेने शिशुविहान इंग्रजी माध्यम शाळेच्या आर्यन छेडाला पराभूत केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत आयईएस ओरियन शाळेच्या पार्थ शेळके याने श्रीराज कथाडे विरुद्ध विजय मिळवला.
१९ वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद पटकावताना शिशुविहान इंग्रजी माध्यम शाळेच्या शौर्य छाडवाने त्याच्याच शाळेतील वीर विकमला पराभूत केले. याच गटात तिसरा क्रमांक प्राप्त करणाऱ्या शिशुविहान इंग्लिश मीडियमच्या नैतिक गालाने शिशुविहान इंग्लिश मीडियम शाळेच्या सौम्य सावला विरुद्ध बाजी मारली.
विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, शाळेचे ट्रस्टी सतीश लोटलीकर, शाळेच्या प्रिन्सिपॉल स्मिता सुलाखे, आयईएसचे उपाध्यक्ष रमेश राव, शाळेचे माजी क्रीडा शिक्षक हिरामण भोर यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.