
छत्रपती संभाजीनगर : मशिप्र मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयामध्ये शिक्षकांसाठी शिक्षक म्हणजे संवर्धक या विषयावर मानसशास्त्र विभाग आयोजित एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध लेखक, मानसोपचार तज्ज्ञ डॉ आनंद नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक तेजनकर होते.
आपल्या व्याख्यानात डॉ नाडकर्णी यांनी आस्था आपुलकी, तन्मयता, आदीमधून शिक्षकांचे संवर्धक झाले पाहिजे. आस्थेचा झरा ज्यांना सापडतो ते शिक्षकांचे संवर्धक होतात. आजच्या शिक्षण परिप्रेक्ष्यामध्ये संवर्धकाची भूमिका ही अनन्यसाधारण आहे आणि ही संवर्धक मंडळी आपल्याला आपल्या भोवताली शोधता आली पाहिजेत. आपल्या भाषणामध्ये त्यांनी मेंदू विज्ञान, आदिम भावना, प्रगत भावना, आणि उन्नत भावना यासंबंधी विश्लेषण केले. उन्नत भावना म्हणजे उत्कृष्टतेचा ध्यास आणि शिक्षक, पालक या सर्वांनी मिळून उन्नत भावनांचे संक्रमण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आजच्या तंत्रस्नेही जगात केवळ मनोरंजनासाठी दृकश्राव्य माध्यमांचा वापर न करता ज्ञान रंजनासाठी वापर केला पाहिजे. आजच्या शैक्षणिक परिप्रेक्ष्यामध्ये सर्व समावेशक इन्कलूझीव संशोधना बरोबर पार्टीसिपटिव्ह संशोधन होणे गरजेचं आहे तसेच अध्ययन अध्यापन प्रक्रिया करत असताना विद्यार्थी या घटकाला संपूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे असे विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ अशोक तेजनकर सर यांनी इमोशनल फ्रेंडली कॅम्पस, तसेच मेंटरद्वारे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्राध्यापकांनी समुपदेशन केले पाहिजे तसेच यामधून शिक्षक आणि विद्यार्थी यामधील अंतर कमी झाले तर विद्यार्थ्यांच्या अडचणी सहज सोडवता येतील, असे प्रतिपादन केले. या कार्यशाळेसाठी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते, प्रा अरुण काटे, मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ मन्साराम औताडे, डॉ अतुल पवार आदीची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी यांनी कार्यशाळेमध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आणि आभार डॉ मन्साराम औताडे यांनी मानले.