
कर्वेनगर येथे शनिवारी स्पर्धा रंगणार
पुणे ः कुंटे चेस अकादमी यांच्या वतीने व किंडर स्पोर्ट्स एलएलपी यांच्या संलग्नतेने आयोजित चौथ्या मिलेनियम नॅशनल स्कूल व कुंटे चेस अकादमी विविध वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून एकूण २०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा मिलेनियम नॅशनल स्कूल, कर्वे रोड येथे २० जुलै रोजी होणार आहे.
स्पर्धा संचालिका मृणालिनी कुंटे यांनी सांगितले की, ही स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. शहरांत बुद्धिबळ खेळाचा प्रसार आणखी वाढावा या हेतूने मिलेनियम नॅशनल स्कुलने या स्पर्धेसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत २०० खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा गट अ (९ वर्षाखालील), गट ब (११ वर्षाखालील), गट क (१२ वर्षाखालील) आणि गट ड (१५ वर्षाखालील) अशा एकूण ४ गटात होणार आहे. यामध्ये अथर्व येमुल, रियांश पितळे, क्षितिज प्रसाद, राघव पावडे, वेदांत काळे, स्वराज शंकर, सई पाटील, आरूष बुडजादे यांचा समावेश आहे. स्पर्धेत एकूण ३६ हजार रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी आयए दीप्ती शिदोरे या चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहेत.