
संतोष वाकराडकर यांना उपविजेतेपद
पुणे ः पुण्याच्या रवींद्र जोशी व ओंकार जोग खेळाडूंनी नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रौढांच्या पहिल्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील आपापल्या गटात विजेतेपदावर मोहोर नोंदवित कौतुकास्पद कामगिरी केली. ४० वर्षावरील गटात पुण्याच्या संतोष वाकराडकर यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले

ही स्पर्धा नवी मुंबई येथील एलीसीयम क्लब येथे टीटीसी पालव यांनी आयोजित केली होती. प्रौढांच्या ४५ वर्षावरील गटात जोग यांनी अंतिम लढतीत केदार कसबेकर (मुंबई महानगर जिल्हा) यांच्यावर ११-३,६-११,११-३,११-८ अशी मात केली. उपांत्य फेरीत त्यांनी सुहास राणे यांचा पराभव केला होता तर कसबेकर यांनी पिनाक शाळीग्राम यांना पराभूत केले होते. त्यांनी टॉप स्पिन फटक्यांचा सुरेख खेळ केला.

प्रौढांच्या ५५ वर्षावरील गटात जोशी यांनी नागपूरच्या बसाब चौधरी यांना अंतिम लढतीत ११-८,११-६,१७-१५ असे पराभूत केले. त्यांनी काऊंटर अटॅक पद्धतीचा बहारदार उपयोग केला. उपांत्य फेरीत जोशी यांनी प्रसाद नाईक यांना हरविले होते तर चौधरी यांनी भूषण निवगी यांचे आव्हान संपुष्टात आणले होते.
पुण्याच्या संतोष वाकराडकर यांना ४० वर्षावरील गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चुरशीच्या लढतीत अमोल सरोदे यांनी त्यांचा ११-४,१२-१०,७-११,११-८ असा पराभव केला. उपांत्य फेरीत सरोदे यांनी पुण्याच्या विवेक कोलते यांचा पराभव केला होता. ५० वर्षांवरील गटात सोलापूरच्या मनीष रावत हे विजेते ठरले. अंतिम सामन्यात त्यांनी मुंबई महानगर जिल्हा संघाचे खेळाडू शरद ग्रोव्हर यांना ७-११,११-४,११-४, ९-११,११-९ असे अटीतटीच्या लढतीनंतर पराभूत केले. रावत यांनी उपांत्य फेरीत अमित श्रॉफ यांचा पराभव केला होता. ग्रोव्हर यांनी पुण्याच्या नचिकेत देशपांडे यांच्यावर मात करीत अंतिम फेरी गाठली होती.