नवी मुंबई येथे सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत ९७ संघांचा सहभाग  

  • By admin
  • July 19, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

नवी मुंबई ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत होणाऱया सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण क्रीडांगण, सेक्टर १९, नेरुळ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा संचालनालय,मुंबई यांच्याकडून ऑनलाईन प्रणालीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील महानगरपालिका व खाजगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. २०२५-२६ मधील सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत १५ वर्षांआतील मुलांमध्ये ३६ संघ, १७ वर्षांआतील मुलांमध्ये ३८ संघ आणि १७ वर्षांआतील मुलींमध्ये २३ संघ अशा एकूण ९७ संघांनी सहभाग नोंदविला आहे.

या स्पर्धेतून विजयी होणारा संघ पुढील मुंबई विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतो. हा संघ यापुढच्या स्तरावरील स्पर्धेत नवी मुंबई महानगरपालिका जिल्ह्याचा संघ म्हणून मुंबई विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे. सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धचे वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमधील विजेता संघ हा विभागात व राज्य स्तरावर विजयी झाला तर पुढील राष्ट्रीय स्पर्धेत त्या संपूर्ण संघास खेळण्याची संधी मिळते. अशा प्रकारे संपूर्ण संघास राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणारी सुब्रतो फुटबॉल मुखर्जी स्पर्धा ही एकमेव स्पर्धा आहे.

स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित होणाऱया शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकरिता राज्यस्तरीय स्पर्धेतून राज्याचा संघ निवडण्यासाठी स्वतंत्र निवड चाचणी आयोजित केली जाते. ज्यामधून महाराष्ट्र राज्याचा संघ पुढील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवडला जातो. मात्र सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा ही स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येत असते. त्यामुळे एकाच संघाला जिल्हा पातळीपासून थेट राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळण्याची संधी मिळते. या संधीचा लाभ यापूर्वी सन २०१५-१६ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका जिल्हा संघास, फादर ॲग्नल स्कुल, वाशी यांच्या फुटबॉल संघाच्या माध्यमातून मिळाला असून या संपूर्ण संघाला राष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा बहुमान मिळाला आहे. त्यांनी पुन्हा एकदा गतवर्षी राज्यस्तरावर उपविजेते पद मिळविलेले आहे.

नवी मुंबई शहरामध्ये यशवंतराव चव्हाण क्रीडांगणामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे नैसर्गिक गवत आच्छादित दर्जेदार फुटबॉल मैदान उपलब्ध आहे. त्यामुळे शालेय स्तरावरील व शहरातील युवा फुटबॉल खेळाडूंना अतिशय उत्तम सुविधा मिळत आहेत. त्याचा लाभ घेऊ नवी मुंबईमधील खेळाडूंनी फुटबॉल खेळात आपल्यासह शहराचा नावलौकीक उंचवावा अशी अपेक्षा व्यक्त करीत  महापालिका आयुक्त डॉ कैलास शिंदे यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *