
भारतीय संघावर आठ विकेटने विजय, ऑस्ट्रेलियाला टाकले मागे
लंडन ः भारत महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला गेला. हा सामना यजमान इंग्लंड महिला संघाने ८ विकेट्सने जिंकला. घरच्या मैदानावर इंग्लंडने हा १२१ वा विजय नोंदवला आहे हे विशेष.
पावसामुळे हा सामना २९ षटकांचा होता. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघाने २९ षटकात ८ विकेट्स गमावून १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने २१ षटकात हे लक्ष्य सहज गाठले. या विजयासह इंग्लंड महिला संघ घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा संघ बनला आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला आहे. इंग्लंड महिला संघाचा घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये हा १२१ वा विजय होता. ऑस्ट्रेलियन महिला संघाने घरच्या मैदानावर एकदिवसीय सामन्यांमध्ये १२० सामने जिंकले आहेत. आता भारताला पराभूत करून इंग्लंड महिला संघ पुढे गेला आहे.
भारतीय फलंदाज अपयशी ठरले
या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. दुसऱ्याच षटकात प्रतिका रावलच्या रूपात भारतीय संघाला पहिला धक्का बसला. ती १० चेंडूत ३ धावा काढून बाद झाली. त्यानंतर स्मृती मानधना आणि हरलीन देओल यांनी डाव पुढे नेला. पण हरलीनही ४६ धावांवर बाद झाली आणि पॅव्हेलियनमध्ये परतली. तिने २४ चेंडूत १६ धावा केल्या. तिच्या बाद झाल्यानंतर हरमनप्रीत (७), जेमिमा रॉड्रिग्ज (३) आणि रिचा घोष (२) देखील काही खास न करता बाद झाल्या. एका टोकावरून मानधना डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत होती पण तिला इतर फलंदाजांकडून साथ मिळाली नाही. मानधनाही ४२ धावा काढून बाद झाली. तिने तिच्या डावात ५ चौकार मारले. शेवटी, दीप्ती शर्मा ३४ चेंडूत ३० धावा काढून नाबाद परतली. त्याच वेळी अरुंधती रेड्डीने १४ धावांचे योगदान दिले. भारताचा संघ निर्धारित २९ षटकांत ८ गडी गमावून केवळ १४३ धावा करू शकला. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
इंग्लंडकडून एमी जोन्सने शानदार खेळी केली
१४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड महिला संघाची सुरुवात चांगली झाली आहे. सलामीवीर टॅमी ब्यूमोंट आणि एमी जोन्सने पहिल्या विकेटसाठी ५४ धावा जोडल्या. यानंतर, इंग्लंडला नॅट सीव्हर ब्रंटच्या रूपात १०२ धावांच्या स्कोअरवर दुसरा धक्का बसला. ती २५ चेंडूत २१ धावा काढून बाद झाली. तथापि, यानंतर एमी जोन्स आणि सोफिया डंकली यांनी मिळून संघाला विजय मिळवून दिला. जोन्स ५७ चेंडूत ४६ धावा काढून नाबाद राहिली, तर सोफिया डंकलीनेही ९ धावा काढून नाबाद परतली. इंग्लंडच्या महिला संघाने २१ षटकांत हा सामना जिंकला. या विजयासह, इंग्लंडने या मालिकेत बरोबरी साधली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिला संघाने ५ गडी राखून विजय मिळवला.