
महिला आशिया कप स्पर्धेची तयारी
नवी दिल्ली ः स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटर (साई) येथे २१ जुलै ते २९ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरासाठी हॉकी इंडियाने ४० खेळाडूंची नावे जाहीर केली. ५ सप्टेंबरपासून चीनमधील हांगझोऊ येथे होणाऱ्या महिला आशिया कपच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर खूप महत्त्वाचे मानले जात आहे. ही स्पर्धा २०२६ च्या एफआयएच महिला विश्वचषकासाठी थेट पात्रता मिळवण्याचे साधन देखील असेल.
गेल्या शिबिरात सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंनाही यामध्ये संधी देण्यात आली आहे. भारतीय महिला हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, “हे शिबिर अतिशय महत्त्वाच्या वेळी आयोजित केले जात आहे. आशिया कप ही एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे तसेच २०२६ च्या विश्वचषकात थेट स्थान मिळवण्याचे एक साधन आहे. आमचे संपूर्ण लक्ष मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वतःला तयार करण्यावर असेल.”
हरेंद्र सिंग म्हणाले की, “कामगिरीत सातत्य राखण्यासाठी आम्ही गेल्या शिबिराचा मुख्य गट कायम ठेवला आहे. युरोपमधील प्रो लीगमध्ये आम्हाला अपेक्षित निकाल मिळाले नाहीत परंतु या शिबिरामुळे आम्हाला आत्मपरीक्षण करण्याची आणि मजबूत पुनरागमन करण्याची संधी मिळेल.” भारतीय वरिष्ठ कोअर ग्रुपची यादी खालीलप्रमाणे आहे.
गोलरक्षक : सविता, बिच्छू देवी खरीबम, बन्सरी सोलंकी, माधुरी किंदो, समीक्षा सक्सेना.
बचावपटू : महिमा चौधरी, निक्की प्रधान, सुशीला चानू, उदिता, इशिका चौधरी, ज्योती छत्री, ज्योती, अक्षता ढेकळे, अंजना डुंगडुंग, सुमन देवी.
मिडफिल्डर : सुजाता कुजूर, वैष्णवी विठ्ठल फाळके, नेहा, सलीमा टेटे, मनीषा चौहान, आजमिना कुजूर, सुनीलिता टोप्पो, लालरेमसियामी, शर्मिला देवी, बलजीत कौर, महिमा टेटे, अलबेला राणी टोप्पो, पूजा यादव.
फॉरवर्ड ः दिपिमोनिका टोप्पो, रितिका सिंग, दीपिका सोरेंग, नवनीत कौर, संगीता कुमारी, दीपिका, रुतुजा पिसाल, सौंदर्य डुंगडुंग, मुमताज खान, अन्नू, चंदना जगदीश, काजल आटपाडकर.