
मंगळवारपासून अंडर १५, १७ स्पर्धेला प्रारंभ
पुणे ः सुधांशु बॅडमिंटन अकादमी यांच्या वतीने व रोहित ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित पीवायसी – पिनॅकल फाऊंडेशन आणि एसबीए कप पुरस्कृत योनेक्स सनराईज राज्यस्तरीय १५ व १७ वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत राज्यभरातून ११४० खेळाडूंनी आपला विक्रमी सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना बॅडमिंटन कोर्ट या ठिकाणी २२ ते २७ जुलै या कालावधीत रंगणार आहे.
या स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा सचिव सुधांशु मेडसीकर यांनी सांगितले की, स्थानिक पातळीवर बॅडमिंटनला खेळाडूंकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. या खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आम्ही एक चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत.
ही स्पर्धा पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना यांच्या मान्यतेखाली १५ व १७ वर्षांखालील मुले व मुलींच्या एकेरी गटात होणार आहे. या स्पर्धेत शरयू रांजणे, सोयरा शेलार, विश्वजीत थवील, ऋत्वा सजवान आणि शौर्य मांडवी या मानांकित खेळाडूंचा समावेश असणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन रोहित ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हिरु मोटवानी, रोहित ग्रुपचे संचालक राजीव मोटवानी, पीवायसी हिंदू जिमखाना अध्यक्ष कुमार ताम्हाणे आणि पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटनेचे खजिनदार सारंग लागू यांच्या हस्ते होणार आहे.