
डुबॉइसला नॉकआउट करून जेतेपद पटकावले
लंडन ः युद्धग्रस्त युक्रेनचा ३८ वर्षीय व्यावसायिक बॉक्सर ओलेक्झांडर उसिक याने वेम्बली स्टेडियमवर झालेल्या पाचव्या फेरीत ब्रिटनच्या डॅनियल डुबॉइसला नॉकआउट करून निर्विवाद जागतिक हेवीवेट चॅम्पियनचा किताब परत मिळवला.
उसिक याने शक्तिशाली डाव्या हुकने दुबॉइसचा पराभव केला, जागतिक बॉक्सिंग असोसिएशन, कौन्सिल आणि ऑर्गनायझेशन बेल्ट तसेच आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशन बेल्ट पुन्हा जिंकला. उसिकने गेल्या वर्षी फ्युरीला दोनदा हरवून निर्विवाद हेवीवेट चॅम्पियनचा किताब जिंकला.
मुहम्मद अलीच्या विक्रमाची बरोबरी
उसिक आता दिग्गज मुहम्मद अली आणि फ्लॉइड पॅटरसननंतर दोनदा जेतेपद जिंकणारा तिसरा खेळाडू बनला आहे. उसिक म्हणाला, मी साडेतीन महिने तयारी केली आणि या काळात माझे कुटुंब आणि पत्नीला भेटलो नाही. मला घरी परत जायचे आहे. यूट्यूबर जॅक पॉलने त्याला एमएमए लढतीसाठी आमंत्रित केले आहे.
निशांतचा सलग तिसरा विजय
भारतीय व्यावसायिक बॉक्सर निशांत देवने अमेरिकन बॉक्सर लाक्वान इव्हान्सचा पराभव केला. २४ वर्षीय निशांतने सामन्याच्या सहाव्या फेरीत १:५८ मिनिटांनी तांत्रिक नॉकआउटने विजय मिळवला. हा त्याचा सलग तिसरा विजय होता. २०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक विजेता निशांतने इव्हान्सवर सतत हल्ला केला, त्यानंतर पंचांनी सामना थांबवला.