
हरमन आणि व्हॅन डर ड्यूसेनची वादळी फलंदाजी
हरारे ः झिम्बाब्वेमध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यात टी २० तिरंगी मालिका खेळली जात आहे. या तिरंगी मालिकेतील चौथा सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळला गेला. आफ्रिकन संघाने हा सामना ७ विकेट्सने जिंकला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या तिरंगी मालिकेचा अंतिम सामना २६ जुलै रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला जाईल.
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वे संघाचा सलामीवीर वेस्ली माधेव्हेरेने १४ चेंडूत १३ धावा केल्या, तर ब्रायन बेनेटने ४३ चेंडूत ६१ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या डावात त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज क्लाईव्ह मदंडेने ८ चेंडूत ८ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार सिकंदर रझा फलंदाजीत अपयशी ठरला. त्याने १२ चेंडूत ९ धावा केल्या. रायन बर्लने मधल्या फळीत चांगली फलंदाजी केली, त्याने ३१ चेंडूत ३६ धावा केल्या आणि झिम्बाब्वेला १४४ धावांपर्यंत पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशने सर्वाधिक २ बळी घेतले. त्याने आपल्या चार षटकात १६ धावा दिल्या.
दक्षिण आफ्रिकेला सहज विजय
दक्षिण आफ्रिकेने १४५ धावांचा हा पाठलाग १७.२ षटकात ३ गडी गमावून पूर्ण केला. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. सलामीवीर लुआन-ड्रे प्रिटोरियस ७ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. रीस हेंड्रिक्सने १३ चेंडूत ६ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेचे दोन्ही सलामीवीर २२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने ४१ चेंडूत ६ चौकारांसह ५२ धावांची शानदार खेळी केली. याशिवाय रुबिन हरमनने ३६ चेंडूत ६३ धावा केल्या. त्याने आपल्या डावात ३ चौकार आणि ४ षटकार मारले. या दोन्ही फलंदाजांच्या वादळी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना सहज जिंकला. झिम्बाब्वेकडून टिनोटेंडा मापोसा याने सर्वाधिक बळी घेतले. त्याने ४ षटकांत ३८ धावा देऊन २ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.