
जळगाव : जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन सन २०२५-२६ अंतर्गत क्रीडा शिक्षकांसाठी शालेय क्रीडा स्पर्धा अद्यायावत नियम शिबीर ही कार्यशाळा मंगळवारी (२२ जुलै) आयोजित केली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या आयोजन व नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त जिल्हास्तरीय एकविध खेळ संघटना पदाधिकारी व जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे पदाधिकारी तसेच सर्व तालुका क्रीडा समन्वयक यांच्यासह बैठकीचे आयोजन संपन्न झाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षकांना खेळांचे नियम व नियमावलीचे तसेच ऑनलाईन स्पर्धा प्रणालीचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक असल्याने ‘शालेय क्रीडा स्पर्धा अद्यायावत नियम शिबीर’ या कार्यशाळेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन २२ जुलै रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी चार या कालावधीत करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षण शिबीराचे आयोजन जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांमधील क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांच्यासाठी करण्यात येत आहे. सर्वांना प्रवेश विनामूल्य राहील. परंतु नोंदणी करणे आवश्यक राहील. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.