
रायगड ः रायगड जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या निसर्गा गवळीची राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग पंच परीक्षेत निवड झाली होती. या पंच परीक्षेसाठी थाई बॉक्सिंग इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष पाशा अत्तार यांनी पंच परीक्षेसाठी उपस्थित असलेल्या नवीन ऑफिसिअल पंचांना प्रशिक्षण दिले व संपूर्ण थाई बॉक्सिंगच्या नियमावलीचे वाचन करून गुण रेखा आणि इशाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन देत गुण तक्ता समजावून लेखी परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेसाठी मुंबई विभाग अध्यक्ष हरी ओम, उपाध्यक्ष अजय सरोदे तसेच महाराष्ट्र महिला सुरक्षा कमिटीच्या अध्यक्षा अरुणा हिवरकर आणि रायगड जिल्हा अध्यक्ष स्वप्निलअडूरकर आदी मान्यवर उपस्थितीत होते. परीक्षेसाठी मोहिनी आडुरकर, सौरभ गुरव, दिशांत भोईर, वैदेही जाधव व मुंबई विभागातील मुलांचाही सहभाग होता.
निसर्गा गवळीने अ ग्रेडमध्ये उत्तीर्ण होऊन राज्यस्तरीय पंच होण्याचा बहुमान मिळविला. निसर्गा ही यादवराव तासगावकर पॉलिटेक्निक कॉलेज चांदई येथे पहिल्या वर्षात शिकत आहे. अनेक राष्ट्रीय तर एशियन स्पर्धेत तिने सुवर्ण पदक जिंकून नावलौकिक केला आहे. रायगड जिल्हा अध्यक्ष, सचिव प्रशिक्षक स्वप्निल अडूरकर, मोहिनी अडूरकर यांचे तिला मोलाचे सहकार्य लाभले आहे. कॉलेजचे प्राचार्य व शिक्षिका शिक्षक वृंद आदींनी तिचे अभिनंदन केले.